ग्रामपंचायत निवडणुकीत वाढला मतदानाचा टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:30+5:302021-02-05T05:53:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पार पडल्या. गावकीची पंचाईत दूर झाली असली तरी कुणी कुठे ...

ग्रामपंचायत निवडणुकीत वाढला मतदानाचा टक्का
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पार पडल्या. गावकीची पंचाईत दूर झाली असली तरी कुणी कुठे मतदान केले याचे हिशोब बेरकी राजकारणी मारत बसले असतील. मात्र, यंदा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल ७८.११ टक्के मतदान झाले आहे.
गावातील निवडणुका म्हटल्या की, भावकीचे राजकारण सुरू होते. एकाच भावकीतील दोन जण उभे असतील. तर वाद नको म्हणूनदेखील अनेकजण मतदानाला जात नाही. मात्र, यंदा असे फारसे झालेले दिसून येत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल ७८ टक्केपेक्षा जास्त मतदान झाले आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीपेक्षा देखील हे मतदान जास्त आहे. २०१४ मध्ये त्यावेळच्या सरकारविरोधात जोरदार लाट होती. त्यामुळे लोकांनी पुढे येत मतदान केले होते. त्यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघात ६३.३४ टक्के मतदारांनी पुढे येत मतदान केले होते. तर जळगाव लोकसभा मतदारसंघात ही आकडेवारी कमी होती. मात्र, यंदाचे बदललेले राजकीय चित्र त्यातून सध्याच्या राज्य सरकारविरोधातील नाराजी पाहता अनेक जण मतदानाला पुढे आल्याचे दिसत आहे.
लोकसभेसाठी मतदान
जळगाव जिल्ह्यात लोकसभेचे रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात दोन्हीवेळा जळगाव मतदारसंघापेक्षा रावेरला जास्त मतदान होत असते. २०१९ मध्ये देखील रावेरला ६१ टक्के मतदान झाले होते. तर जळगावला ५६ टक्केच मतदान झाले होते.
विधानसभेला मतदान
जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात २०१९ ला ५८.६० टक्के मतदान झाले होते. जळगाव शहर मतदारसंघांमध्ये मतदानाला नागरिकांचा फारसा उत्साह नव्हता. त्यावेळी काही ठिकाणी अगदीच एकेरी लढती झाल्या होत्या. त्यामुळे देखील विधानसभेत मतदानाला नागरिकांचा फारसा उत्साह नव्हता.
ग्रामपंचायत मतदान
जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यात शिरसोली प्र.न. आणि शिरसोली प्र.बो., म्हसावद, भादली, आसोदा या मोठ्या ग्रामपंचायतींमध्येदेखील मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. तसेच ममुराबाद, आव्हाणे येथेही मोठ्या प्रमाणात मतदान झाले.
आकडेवारी
लोकसभा निवडणूक
२०१४
रावेर मतदारसंघ - ६३.३४ टक्के
जळगाव मतदारसंघ - ५७.९८ टक्के
विधानसभा निवडणूक २०१९
५८.६० टक्के
ग्रामपंचायत निवडणूक २०२१
७८.११ टक्के