चाळीसगावकरांच्या घशाला पडतेय कोरड; १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2023 15:15 IST2023-10-19T15:15:39+5:302023-10-19T15:15:49+5:30
१३ गावांना टंचाईचा चटका, चाळीसगाव तालुक्यातील १४ पैकी बहुतांशी प्रकल्प कोरडेठाक आहेत

चाळीसगावकरांच्या घशाला पडतेय कोरड; १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
कुंदन पाटील
जळगाव : चाळीसगाव तालुक्याला दिवसेंदिवस पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. गेल्या चार दिवसात टॅंकरच्या संख्येत २ ने वाढ झाली आहे. या तालुक्यात १३ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील १४ पैकी बहुतांशी प्रकल्प कोरडेठाक आहेत. या तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने पिकांचीही परिस्थिती नाजूक असून रब्बीला फटका बसण्याची शक्यता आहे. तशातच १३ गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या १३ गावात १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तर २ गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या तालुक्यालावगळता जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यात टॅंकरेद्वारे पाणीपुरवठा होत नाही.
भूजलपातळीतही घट
चाळीसगाव तालुक्यातील भूजलपातळी १.५२ मीटरने घटली आहे. त्यामुळे डिसेंबरनंतर या तालुक्याला दुष्काळाची झळ सहन करावी लागणार आहे. जळगाव, धरणगाव, चोपडा, अमळनेर व भडगाव तालुक्यातही पाणीपातळीत घट निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणांमधील साठा पिण्यासाठी आरक्षित करण्याला प्रशासन प्राधान्य देणार आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.