राजभाषा ही न्यायभाषा झाली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धन होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 21:59 IST2021-01-19T21:58:54+5:302021-01-19T21:59:30+5:30
डॉ. संजीवकुमार सोनवणे : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

राजभाषा ही न्यायभाषा झाली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धन होईल
जळगाव- लोकांच्या भाषेत न्यायव्यवहार हे लोकशाही राजव्यवस्थेचे महत्त्वाचे तत्व आहे, त्यासाठी न्यायालयीन कामकाजात इंग्रजीची जागा मराठीने घेतली पाहिजे. राजभाषा ही न्यायभाषा झाली तर खऱ्या अर्थाने मराठी संवर्धनाचे काम होईल, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले.
मराठी भाषा पंधरवडा निमित्त जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाच्यावतीने 'न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर' या विषयावर व्याख्यान पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी हे होते तर मंचावर जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के. एच. ठोंबरे, न्यायाधीश आर. जे. कटारीया, न्या. डी. ए. देशपांडे, न्यायधीश एस. जी. ठुबे, जिल्हा वकिल संघाचे उपाध्यक्ष ॲड. प्रभाकर पाटील, सचिव दर्शन देशमुख यांची उपस्थिती होती.
मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी बोलीभाषा टिकल्या तर मराठी टिकेल, याची जाणीव करून दिली. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेत विपुल साहित्य निर्मिती होऊनही दुर्लक्ष झाले आहे, ज्यावर अन्याय होतो तो दऱ्या कपारीतील, खेडेगावातील सामान्य माणूस आहे, त्याची न्यायालयीन कामकाजाविषयी भिती दूर करण्यासाठी मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन के. एच.ठोंबरे यांनी केले तर आभार आठवे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ) पी. ए. श्रीराम यांनी मानले.