'माझ्याने सहन होत नाही जानू आता...'; इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत कॉलेजमध्येच तरुणाने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:04 IST2025-04-28T13:04:06+5:302025-04-28T13:04:29+5:30

विद्यार्थ्याने इन्स्टाग्रामवर 'माझ्याने सहन होत नाही जानू आता', असा संदेश व तरुणीसोबतचा फोटो स्टोरीवर ठेवून जीवन संपवले.

I cant bear it anymore Young man ends his life in college while posting story | 'माझ्याने सहन होत नाही जानू आता...'; इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत कॉलेजमध्येच तरुणाने संपवलं जीवन

'माझ्याने सहन होत नाही जानू आता...'; इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत कॉलेजमध्येच तरुणाने संपवलं जीवन

जळगाव : ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता, त्याच महाविद्यालयाच्या परिसरातील झाडाला गळफास घेऊन सतीश बाविस्कर  या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजता नूतन मराठा महाविद्यालय परिसरात उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थ्याने इन्स्टाग्रामवर 'माझ्याने सहन होत नाही जानू आता', असा संदेश व तरुणीसोबतचा फोटो स्टोरीवर ठेवून त्याने जीवन संपवले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी रामचंद्र पाटील हे नूतन मराठा महाविद्यालय परिसरात प्लम्बिंग कामासाठी गेले. त्यावेळी त्यांना स्वच्छतागृहाजवळील एका चिंचेच्या झाडाला एक जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी याविषयी वॉचमनला माहिती दिली. जिल्हापेठ पोलिसांना याविषयी माहिती मिळताच पोउनि उल्हास चहाटे, पोहेकॉ. अनिता वाघमारे, जयेश मोरे, विशाल साळुंखे हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी विद्यार्थ्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

'लय मिस करेल जानू तुला...', व्हिडीओदेखील अपलोड
 
सतीश याने एका तरुणीसोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, 'माझ्याने सहन नाही होत जानू आता, माफ कर मला, जातोय मी सगळ्यांना सोडून, लय मिस करेल जानू तुला'. या शिवाय एक व्हिडीओदेखील त्याने सोशल मीडियावर ठेवलेला असून, त्यातून त्याचा प्रेमभंग झाल्याचे दिसून येत आहे.

अनाथ मुलगा

सतीश हा शहरातील एका हॉटेलवर काम करून शिक्षण घेत होता. त्याच्या मित्रांनाही त्याच्या आई-वडिलांची माहिती नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. शहरातील एक कुटुंब त्याचा सांभाळ करीत होते.

परीक्षा काळात पेपरला दांडी
सतीश हा कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. प्रेमभंगामुळे तो विचारात राहत होता व परीक्षा काळात अनेक पेपरलाही तो गैरहजर असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

सुरुवातीला अनोळखी
पोलिस घटनास्थळी पोहचले त्यावेळी अनोळखी म्हणून नोंद घेण्यात आली. नंतर ही वार्ता शहरात पोहचताच सतीशचे काही मित्र रुग्णालयात पोहचले. त्यावेळी त्यांनी ओळख पटवली. तसेच, पोलिसांनीही महाविद्यालयाकडून माहिती घेतली असता, मयताचे नाव सतीश बाविस्कर असल्याचे समजले.
 

Web Title: I cant bear it anymore Young man ends his life in college while posting story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.