मी जळगावाचा दादा आहे, पोलीसही मला घाबरतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 23:54 IST2020-11-04T23:53:03+5:302020-11-04T23:54:12+5:30
कारवाई : पिस्तुल घेऊन दहशत मिरविणाऱ्यास अटक

मी जळगावाचा दादा आहे, पोलीसही मला घाबरतात
जळगाव : मी जळगावाचा दादा आहे, माझे कोणीच काही करु शकत नाही, इतकेच पोलीस देखील मला घाबरतात अशी बतावणी करून हातात पिस्तूल घेऊन दहशत माजविणार्या नितेश मिलिंद जाधव ( वय २१, रा. पिंप्राळा, स्मशानभूमीजवळ) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी मुसक्या आवळल्या. महामार्गावरील ब्रेन हॉस्पिटलच्या मागील गल्लीत टपरीजवळ त्याला पकडण्यात आले.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हेगार पिस्तुल घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, अविनाश देवरे, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, दत्तात्रय बडगुजर व महेश महाजन यांच्या पथकाला खात्री करण्यासाठी पाठविले असता, खरोखर तेथे नितेश जाधव हा दादागिरी करून लोकांना धमकावत होता. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. अटक करुन जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.