पत्नीला वाचवताना पतीचा मृत्यू; रूळ ओलांडताना रेल्वेखाली सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 22:00 IST2023-09-24T22:00:42+5:302023-09-24T22:00:59+5:30
डोळ्यादेखतच पतीचा अपघात पाहण्याची वेळ

पत्नीला वाचवताना पतीचा मृत्यू; रूळ ओलांडताना रेल्वेखाली सापडले
शामकांत सराफ
पाचोरा (जि. जळगाव) : रेल्वे रूळ ओलांडतांना कामायनी एक्सप्रेसखाली सापडून महिलेसह दोन जण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना पाचोरा -परधाडे दरम्यान रेल्वे वळण रस्त्यावर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. यात पत्नीला वाचतांना पतीचा मृत्यू झाला.
रत्नाबाई माधवराव पाटील (६१, रा. दुसखेडा ता. पाचोरा) आणि अशोक झेंडू पाटील (६०, रा. पहाण ता. पाचोरा) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परधाडे ता. पाचोरा येथे सप्ताहानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. तो आटोपून रत्नाबाई पाटील, अशोक पाटील व त्यांची पत्नी बेबाबाई पाटील असे तीन जण परधाडेहून दुसखेडा गावाकडे जवळच्या मार्गाने पायीच निघाले होते.
परधाडे- पाचोरा रेल्वे रूळ ओलांडताना अचानक मुंबईकडे जाणाऱ्या कामायनी एक्सप्रेसखाली सापडून रत्नाबाई व अशोक पाटील हे दोघे जागीच ठार झाले. तत्पूर्वी रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच अशोक पाटील यांनी त्यांच्या पत्नीस तात्काळ बाजूला सारल्याने त्यांच्या पत्नी बचावल्या आहेत. डोळ्यादेखतच पतीचा अपघात पाहण्याची वेळ तिच्यावर आली. बेबाबाई यांच्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, ही घटना रविवारी ५ वाजेच्या दरम्यान घडली. मृतदेह ७ वाजेपर्यंत घटनास्थळीच पडून होते. पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती उशिरा मिळाली.