निधीअभावी भुयारी मार्गाचे अडले घोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:09 IST2019-11-06T22:09:13+5:302019-11-06T22:09:54+5:30
जळगाव : रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता म्हणून ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा तयार करण्याची मनपाला परवानगी दिली असून, त्यासाठी खर्चाचे ...

निधीअभावी भुयारी मार्गाचे अडले घोडे
जळगाव : रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता म्हणून ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा तयार करण्याची मनपाला परवानगी दिली असून, त्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रकही पाठविले आहे. मात्र, मनपाकडे निधी नसल्यामुळे हे काम थांबले आहे तर दुसरीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु असल्यामुळे, मनपाने तात्काळ भुयारी बोगद्याासाठी निधी उपलब्ध द्यावा, अशी मागणी शिवाजी नगरवासियांनी मंगळवारी सायंकाळी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, शिवाजीनगरवासियांनी उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत तहसिल कार्यालयाजवळ तात्पुरते गेट किंवा ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा उभारण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. यासाठी हजारो शिवाजीनगरवासियांनी रेले रोको आंदोलनदेखील केले होते. तरीदेखील रेल्वे प्रशासनाने तहसिल कार्यालयाजवळ गेट उभारले नाही. मात्र, दोन महिन्यांपूर्वी ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच यासाठी मनपाला ५ कोटी ७७ लाखांचे अंदाजपत्रकही पाठविले आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता म्हणून शिवाजीनगर वासियांची भुयारी बोगदा उभारण्याची मागणी मंजुर केली आहे. मात्र, या कामासाठी मनपाकडे निधी नसल्यामुळे, या कामाचे भूमीपूजनही झालेले नाही. यामुळे नागरिकांना उड्डाणपुल तयार होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
लोकमतच्या वृत्तानंतर आयुक्तांकडे केली मागणी
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटला असून, अद्याप पायाभरणीचेंही काम झालेले नाही. रेल्वेने १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उदिष्ठ ठेवले असतांना, आता ११ महिन्यांत उड्डाणपुलाचे काम पुर्ण होणार का.. अशा जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे. पुलाच्या संथ गतीच्या कामाबाबत ‘लोकमत’ ने मंगळवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीच्या वतीने तेथील रहिवासी दिपक गुप्ता यांनी आयुक्तांनी भेट घेतली. पुलाच्या कामाला विलंब होणार असल्याने, ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगद्यासाठी निधी देऊन, पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.