भीषण! स्कूल बसखाली चिरडून ५५ वर्षीय व्यक्ती ठार; चालक झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 23:15 IST2024-12-28T23:15:07+5:302024-12-28T23:15:17+5:30
फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भीषण! स्कूल बसखाली चिरडून ५५ वर्षीय व्यक्ती ठार; चालक झाला पसार
Bhusaval Accident: यावल तालुक्यातील अकलूद येथे शुक्रवारी सकाळी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसच्या धडकेत ५५ वर्षीय इसम ठार झाला. हा अपघात मयत पंडित बादशाह पहेलवान ढब्याजवळ चालक बस मागे घेत असताना घडला. घटनेनंतर या घटनेची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आल्यावर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अकलूद, ता. यावल या गावाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे. शुक्रवारी सकाळी या स्कूलची बस (एमएच २१/ बीएच ०६१३) घेऊन चालक हा गावाजवळील पहेलवान यांच्या ढाब्यासमोर होता. बस मागे घेत SCHOOL BUS 613 असताना या बसची धडक लागल्याने पंडित मोहन बादशाह (५५, रा. कासवे) हे जागीच ठार झाले. ते दाढी- कटींग करायला आले होते. या अपघातानंतर चालक घाबरून बस सोडून तेथून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली व तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी बस घेतली ताब्यात
फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी, हवलदार विकास सोनवणे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. पंचनामा करून बसदेखील ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पाडळसा पोलिस पाटील सुरेश खैरनार यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहेत.