राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:48+5:302021-02-05T05:52:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : उमरखेड, जि. यवतमाळ येथे नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर वाळू ...

राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे रजा आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उमरखेड, जि. यवतमाळ येथे नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी मंगळवारी सामूहिक रजा आंदोलन केले. त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना याबाबत निवेदन देखील दिले आहे.
अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांनी पवार आणि सुरोसे यांच्यावर हल्ला केला होता. त्याच्या विरोधात राज्य संघटनेने सामूहिक रजा आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात हल्लेखोरांविरोधात तातडीने मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच नायब तहसीलदार यांच्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करणे, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे गेल्या १७ वर्षात ही यादी प्रसिद्ध झालेली नाही. तसेच तहसील स्तरावर सुरक्षा पुरवण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
या मागण्या या आधी देखील करण्यात आल्या होत्या. मात्र त्या पूर्ण ना झाल्याने तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी सामूहिक रजा आंदोलन केले. यात जिल्हाभरातील विविध तालुक्यांचे तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचा समावेश होता.
यानंतर देखील मागण्या मान्य न झाल्यास ८ मार्चपासून राज्यात सर्व नायब तहसीलदार आणि तहसीलदार हे बेमुदत आंदोलन करतील, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.
फोटो - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देतांना तहसीलदार आणि नायब तहसीलदार