मृदा व जलसंधारणातून ग्रामसमृद्धीचा राजमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:28+5:302021-07-11T04:12:28+5:30

अमळनेर तालुक्यातील अनोरे हे गाव बारामाही दुष्काळी गाव. बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून होते. गावातील लोक मोठ्या ...

Highway of Village Prosperity through Soil and Water Conservation | मृदा व जलसंधारणातून ग्रामसमृद्धीचा राजमार्ग

मृदा व जलसंधारणातून ग्रामसमृद्धीचा राजमार्ग

अमळनेर तालुक्यातील अनोरे हे गाव बारामाही दुष्काळी गाव. बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून होते. गावातील लोक मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी बाहेरगावी सुरतसारख्या ठिकाणी स्थलांतरित होतं होते. गावात एकूण ९२ कुटुंब असून गावाची लोकसंख्या ४५० आहे. अनोरे हे गाव आर्डी-अनोरे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येते. गावाचे क्षेत्रफळ ३६५ हेक्टर आहे.

सन २०१८-१९ यावर्षी गावाने अमीर खान यांच्या पानी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वाॅटरकप स्पर्धेत भाग घेतला. अनोरे गावातील लोकांनी ग्रामसभा घेऊन स्पर्धेचे नियोजन केले. त्यानंतर शिवार फेरीच्या माध्यमातून संपूर्ण गावाचा मृदा व जलसंधारणाचा संपूर्ण आराखडा तयार झाला. गावातील प्रत्येक कुटुंबाने श्रमदानातून एका दिवसात १०० टक्के शोषखड्डे खोदले. प्रत्येक घरासमोर एक झाड लावण्यात आले. गावाच्या एकूण क्षेत्रफळापैकी १३५ हेक्टर क्षेत्रावर यापूर्वी बांधबंदिस्ती करण्यात आली होती. स्पर्धेच्या कालावधीत आणखी १२५ हेक्टर क्षेत्रावर बांधबंदिस्ती करण्यात आली. दहा हेक्टर क्षेत्रावर सलग समतलचर खोदण्यात आले. गावात पूर्वी १९ शेततळी होती. आणखी १४ शेततळी यंत्राच्या साहाय्याने खोदण्यात आली. गावाच्या शिवारातील तीन नाल्यांचे खोलीकरण व सरळीकरण करण्यात आले व पिचिंगचे काम श्रमदानातून करण्यात आले. गावातील तीन विहिरींचे भूजल पुनर्भरण करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून संपूर्ण गावातील घरांचे छतावरील पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले. या पाण्याचा दैनंदिन वापरासोबतच शोषखड्ड्यांच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारण्यासाठी उपयोग झाला आहे. यामुळे गावातील हातपंपांची पाण्याची पातळी सुधारणा झाली असून, बंद पडलेले हातपंप सुरू झाले.

अनोरे गावाने मृदा व जलसंधारणाच्या विविध उपचारांच्या माध्यमातून २४ कोटी लिटर साठवण क्षमता निर्माण केली. २०१९-२०या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पहिल्या पावसातच सर्व शिवार पाणीमय झाले.

मृदा व जलसंधारणाच्या विविध उपचारांच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारण्यासाठी मदत झाली, त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढली आहे. मृदा व जलसंधारणाच्या माध्यमातून उपलब्ध पाण्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी अनोरे गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार केला. गावात दर्शनीय भागात लावण्यात आला आहे. गावातील पाण्याच्या उपलब्धेमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सुटली असून, गावातील २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. दोनशे हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. मागील वर्षी लाॅकडाऊनच्या काळात अनोरे गावाने संपूर्ण अमळनेर तालुक्याला भाजीपाला पुरवला. मागील वर्षी गावाला भाजीपाला विक्रीतून सुमारे २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

गावातील दुधाचे संकलन दरदिवशी १०० लिटरहून १०००-१२००लिटरपर्यंत वाढले. गावातील निम्म्यापेक्षा जास्त कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. गावातील तरुणांनी रोजगारासाठी बाहेरगावी स्थलांतर करणे थांबविले आहे. गावातच आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा संकल्प केला आहे.

गावातील कुटुंबांची गरज ओळखून अमळनेर पंचायत समितीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १७ लाभार्थ्यांना जनावरांचे गोठे मंजूर केले आहेत. ९ गोठ्यांचे काम प्रगतिपथावर आहे. भाजीपाला पिकवून मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याने यावर्षी ५० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकविण्याचे नियोजन केले आहे. मागील वर्षी एका शेतकऱ्याने संत्रीची फळबाग लागवड केली. यावर्षी चार ते पाच शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून फळबागेचे नियोजन केले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून गावातील सर्व ३३ शेततळ्यांचे अस्तरीकरण करण्याचे नियोजन केले आहे. अनोरे गावाला पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वाॅटरकप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

सन २०१९-२०२०या वर्षीचा पश्चिम विभागातून दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर झाला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मृदा व जलसंधारणाच्या कामांच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविली व या पाण्याचा सूक्ष्म सिंचन पद्धतींचा प्रभावीपणे वापर करून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास त्या माध्यमातून ग्रामीण भागात समृद्धी येईल व प्रत्येक कुटुंब लखपती होईल. यासाठी सर्व गावांनी प्रशासन व पानी फाउंडेशनसारख्या अशासकीय संस्था यांच्या मदतीने नियोजन करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

- संदीप दिलीप वायाळ, सहायक गटविकास अधिकारी, अमळनेर

Web Title: Highway of Village Prosperity through Soil and Water Conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.