एकूण लसीकरणात सर्वाधिक डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:25+5:302021-08-01T04:16:25+5:30

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणास वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत १० लाख ११ हजार ५०९ ...

The highest dose in total vaccination is given to citizens above 45 years of age | एकूण लसीकरणात सर्वाधिक डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना

एकूण लसीकरणात सर्वाधिक डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणास वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत १० लाख ११ हजार ५०९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात ७ लाख ७३ हजार ९२ नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर २ लाख ३८ हजार ४१७ नागरिकांना दुसरा डोस दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला लसीकरणासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते; मात्र नंतर रांगा लागून १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यात सर्वाधिक ७ लाख १६ हजार ७० डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात आले आहेत.

आरोग्यसेवक ते सामान्य नागरिक

जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊन पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले तर १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास सुरूवात करण्यात आली.

अधिक लसीची मागणी

जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर काहीसा प्रतिसाद कमी होता. मात्र नंतर केंद्रांवर रांगा लागू लागल्या. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकही स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. नागरिकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे मोठ्या प्रमाणात लसीची मागणी नोंदविली असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याला नुकतेच ४९ हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ७३ हजार ९२ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस तर २ लाख ३८ हजार ४१७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

सर्वाधिक डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणात सर्वाधिक ७ लाख १६ हजार ७० डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात आले आहेत. लसीकरणांतर्गत ६२ हजार ९७९ डोस हेल्थ केअर वर्कर्सला दिलेत. त्यात पहिला डोस ३० हजार ४६८ तर दुसरा डोस २० हजार ७०२ व्यक्तींनी घेतला आहे. तर ९० हजार २८ डोस फ्रंटलाईन वर्कर्सला दिलेत. त्यात पहिला डोस ६२ हजार ९७९ व्यक्तींनी, तर २७ हजार ४९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील ७ लाख १६ हजार ७० नागरिकांना लसीचे डोस दिलेत. त्यात पहिला डोस ४ लाख ६३ हजार ८०४ व्यक्तींनी तर दुसरा डोस १ लाख ७२ हजार २६६ व्यक्तींनी घेतल्याची नोंद शासनाच्या कोविन पोर्टलवर देण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन असून जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसीनुसार नागरिकांचा प्राधान्यक्रम ठरवून लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणास गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

Web Title: The highest dose in total vaccination is given to citizens above 45 years of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.