पाऊस जोरात कपाशी पीक मात्र कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:38+5:302021-09-12T04:20:38+5:30
यावर्षी मृग नक्षत्रात कापूस पिकाची पेरणी झाल्याने शेतकरी आनंदित झाला होता. जुन्या जाणकारांच्या म्हणण्याप्रमाणे मृग नक्षत्राची पेरणी शेतकऱ्यांना वरदान ...

पाऊस जोरात कपाशी पीक मात्र कोमात
यावर्षी मृग नक्षत्रात कापूस पिकाची पेरणी झाल्याने शेतकरी आनंदित झाला होता.
जुन्या जाणकारांच्या म्हणण्याप्रमाणे मृग नक्षत्राची पेरणी शेतकऱ्यांना वरदान ठरत असते. मात्र आता अतिपावसाने तेही खोटे ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बळीराजा भीतीने पार खचून गेला असून पीक चाळीस-पन्नास टक्केही येते की नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
मागीलवर्षी पीक विमा मिळाला नाही. मात्र यावर्षी तरी आता पीक विमा मिळावा, अशी जोरदार मागणी सातगाव, पिंप्री, तांडा, वाडी, शेवाळे, वडगाव कडे आदी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
ऐन पेरणीच्या वेळेस शेतकरी पोटाला चिमटा देऊन पीकविमा भरत असतात. मात्र अशा वेळेस जर पीकविमा मिळाला नाही, तर शेतकऱ्यांचा विश्वास उडाला शिवाय राहणार नाही.
महागडे बियाणे, रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले भाव तसेच पिकांवरील औषधींचा भरमसाठ खर्च, यामुळे शेतकरी फार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शासनाने पिकांचे पंचनामे करावेत. पीकविमा मिळावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
खर्च सव्वा रुपया, उत्पादन मात्र आठ आणे अशी अवस्था आज या परिसरामध्ये झाली आहे. म्हणून जगाच्या पोशिंद्याला वाचवायचे असेल तर शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून निश्चितपणे आर्थिक मदत करावी, असे साकडे बळीराजाने सरकारला घातले आहे.
अतिपावसाने कपाशीचे पीक खराब झाले असून, लाल पडत आहे. शासनाने कपाशी पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यांना विमा कंपनीने पीक विमा मंजूर करावा.
-अशोक सुकदेव पाटील, शेतकरी, सातगाव (डोंगरी), ता. पाचोरा
कपाशी पिकाला खूपच पाणी कमी लागत असते. मात्र यावर्षी अतिपाऊस झाल्याने कपाशी पिकासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी.
-भगवान पुंडलिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य, वडगाव कडे, ता. पाचोरा