पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश हा आई कल्पनाबाई हिच्यासोबत पांझरापोळ चौकात वास्तव्याला होता. वडीलांचे निधन झालेले आहे तर मोठा भाऊ विवाहित असून धुळे येथे वास्तव्याला आहे. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. बहिण विवाहित असून ती सासरी आहे. एमआयडीसीतील कंपनीत हेल्पर म्हणून तो काम करीत होता. बुधवारी रात्री दिनेश याने आईसोबत जेवण केले. त्यानंतर आईला झोपायला सांगून मी मित्राकडे जाऊन येतो असे म्हणत तो बाहेर पडला. का. ऊ. कोल्हे शाळेच्या परिसरातच त्याचे मित्र वास्तव्याला आहेत. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता एका तरुणाने झाडाला गळफास घेतल्याचे दृष्य नजरेस पडल्यानंतर त्याची चर्चा झाली. मित्र कुणाल कोळी याने त्याला ओळखले. त्याने नातेवाईक व इतर मित्रांना ही माहिती दिली. दरम्यान, शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व पंचनामा करुन मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महिनाभरापूर्वीच सिव्हीलमध्ये उपचार
दिनेशला मुतखड्याचा प्रचंड त्रास होता. महिनाभरापूर्वीच त्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. मात्र परत तोच त्रास सुरू झाला. प्रचंड वेदना होत असल्याने हा त्रास असह्य झाला. अधूनमधून अचानक त्रास होत असल्याने दिनेश नैराश्यात आला होता. विधवा आईसाठी दिनेशच आधार होता, मात्र हाच आधार गेल्याने आईने एकच हंबरडा फोडला.