हॉटेलमध्ये आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, फरार हल्लेखोराला अटक
By विजय.सैतवाल | Updated: October 7, 2023 18:45 IST2023-10-07T18:43:16+5:302023-10-07T18:45:31+5:30
पाळधीतील हॉटेलमध्ये येताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

हॉटेलमध्ये आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, फरार हल्लेखोराला अटक
जळगाव: जून्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार करून अडीच महिन्यांपासून फरार असलेल्या ललित उमाकांत दीक्षित याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पाळधीतील हॉटेलमध्ये येताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
जुन्या वादातून सम्राट कॉलनीतील शुभम भगवान माळी यांच्यावर ललित उमाकांत दीक्षित याच्यासह दोन साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले होते. ही घटना २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ललित हा फरार होता. ललित याच्यावर यापूर्वी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुक्रवारी तो पाळधी येथे आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. संशयित सायंकाळी पाळधी येथील एका हॉटेलमध्ये येताच त्याला पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, सचिन पाटील, इमरान सय्यद, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी यांच्या पथकाने अटक केली. शनिवारी त्याला न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.