पंकजाताईंना सेना प्रवेशासाठी गुलाबभाऊची साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:33+5:302021-08-01T04:16:33+5:30
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या जोरात आहे.ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना पुन्हा भाजपमध्ये ओबीसी ...

पंकजाताईंना सेना प्रवेशासाठी गुलाबभाऊची साद
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या जोरात आहे.ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना पुन्हा भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात असल्याचे आरोप सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांना राजीनामे मागे घेण्याचे आवाहन केले असताना आता कार्यकर्त्यांनी पंकजाताईंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी लावून धरली आहे. मुंडे परिवाराचा असलेला प्रभाव लक्षात घेत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट पंकजाताईंना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी साद घातली आहे. ओबीसींसाठी भाजपने कितीही कळवळा दाखविला तरी माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी नेत्यांना भाजपने कसे डावलेले, हा संदर्भ त्यांनी दिला. हे सांगत असताना पंकजाताई यांचा शिवसेनेमध्ये योग्य तो सन्मान होईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गुलाबभाऊंनी शिवसेना प्रवेशासाठी दिलेल्या सादेला पंकजाताई कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागून आहे.
विलास बारी, जळगाव.