'व्हॅलेंटाईन डे' ला नातवाच्या लग्नाला, आजी सही करायला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:16 IST2025-02-15T16:15:56+5:302025-02-15T16:16:10+5:30

नातवाने आज्जीबाईंना दुचाकीवर रवाना केले आणि मग दोघे वैवाहिक जीवनाच्या वाटेवर निघाले...

Grandmother signs for grandsons wedding on Valentines Day | 'व्हॅलेंटाईन डे' ला नातवाच्या लग्नाला, आजी सही करायला!

'व्हॅलेंटाईन डे' ला नातवाच्या लग्नाला, आजी सही करायला!

जळगाव : तीन बहिणी अन् एक भाऊ... चौघांचे विवाह उरकता उरकता कुटुंबिय खर्चात पडले. आता नाहक खर्च नको म्हणून धुळ्यात प्रेम बहरलेल्या प्रेमीयुगुलाने 'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर नोंदणी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दमलेल्या आजीबाईच्या साक्षीने शासकीय मांडवात नवदाम्पत्याने विवाह आटोपला... तेव्हा आनंदलेल्या आजीबाईचा चरणस्पर्श करुन नवदाम्पत्य वैवाहिक जीवनाच्या वाटेवर मार्गस्थ झाले.

पारोळा तालुक्यातील सौरभवाल्मिक बिन्हाडे आणि साक्रीतील दहिवेलची कल्याणी संजय बागले यांची ही 'लव्ह' गाथा. धुळ्यात ११ वीच्या वर्गात दोघे एकत्र आले आणि तिथेच एकमेकांमध्ये गुंतून बसले. सौरभ नोकरीला लागला. कल्याणी पदवीच्या शेवटच्या वर्षात. पण सौरभला तीन बहिणी आणि एक भाऊ. तीन बहिर्णीना हळद लागून झाली. काही महिन्यांपूर्वी मोठ्या भावाचंही उरकलं. लग्नाचा खर्च तसा पेलवणारा नव्हता. म्हणून सौरभ आणि कल्याणी नोंदणी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

 सौरभने बहिणीसह त्याची आजी मुक्ताबाईंना विवाह नोंदणी कार्यालयात आणले. तेव्हा शासकीय कागदावर ठासून सही करणारी आजीबाई आनंदाने 'नातू हाय ना...' म्हणत सुखवार्ता सांगत गेली. हा विवाह आटोपला. सौरभ आणि कल्याणीने एकमेकांना पेढा भरवला. लग्नातील अनावश्यक खर्च टळला म्हणून होतेच दोघे समाधानी. पण नातलगांची सोयीने छोटेखानी पंगत भरवू म्हणून सांगायलाही ते विसरले नाहीत. तेव्हा नातवाने आज्जीबाईंना दुचाकीवर रवाना केले आणि मग दोघे वैवाहिक जीवनाच्या वाटेवर निघाले...

संथ सर्व्हरमुळे वरमाला कोमजल्या...
'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर राज्यभरात नोंदणी विवाहासाठी सरसावणाऱ्या उपवर-वधूंची संख्या जास्त होती. म्हणून सकाळपासून पाच दाम्पत्य विवाहासाठी दाखल झाले. मात्र राज्यभरातील नोंदणीचा भार एकाचवेळी आल्याने या सर्व्हरची यंत्रणा ठप्प झाली. दोन तासांनी सुरु झालेली ही तांत्रिक यंत्रणा संथगतीने सुरु झाली. त्यामुळे उपवर-वधूंच्या हातातल्या वरमाला काहीशा कोमजून गेल्या होत्या... उत्साह मात्र कायम होता.

Web Title: Grandmother signs for grandsons wedding on Valentines Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.