जामनेर तालुक्यातील पाळधी येथे रेशन यादीच्या घोळावरून ग्रामसभेत दांगडो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 06:29 PM2017-12-28T18:29:43+5:302017-12-28T18:37:08+5:30

वाढीव यादीसह श्रीमंताची नावे रद्द करण्याबाबत केला ग्रामसभेत ठराव

in gramsabha in the ration list of ration list at the palanquin of Jamner Taluka | जामनेर तालुक्यातील पाळधी येथे रेशन यादीच्या घोळावरून ग्रामसभेत दांगडो

जामनेर तालुक्यातील पाळधी येथे रेशन यादीच्या घोळावरून ग्रामसभेत दांगडो

googlenewsNext
ठळक मुद्देसंतप्त महिलांनी घातला सरपंचांना घेरावसंतप्त महिलांनी अर्धा तास केला रास्तारोकोसरपंचांनी घेतला काढता पाय

आॅनलाईन लोकमत
पाळधी, ता.जामनेर,दि.२८ : रेशनदुकानाच्या यादीत घोळ करून गरजू लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप संतप्त महिलांसह नागरिकांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर ग्रामसभेत गुरुवारी केला. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तणावाचे वातावरण होऊन गोंधळ उडाला. यादरम्यान सरपंचांनी वाढीव यादीसह श्रीमंतांचे नावे रद्द करण्याचे जाहीर करीत सभा बरखास्त केली. त्यानंतर संतप्त महिलांनी रास्तारोको आंदोलन केले.
रेशनधान्य वाटप, लाभार्थ्यांची मुळ यादी व वाढीव यादीचे वाचन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी दहा वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच डिगंबर माळी, ग्रामसेवक आर.जी.पवार, सुभाष परदेशी, योगेश पाटील, अमित पाटील, विठ्ठल पाटील, आसिफ पठाण, उपसरपंच जायदा मस्तान तडवी, सचिन पाटील यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते.
संतप्त महिलांनी घातला सरपंचांना घेराव
सरपंच व सदस्यांनी गरजू लोकांचे नावे वगळून त्यांचे नातेवाईक व हितचिंतकांची नावे रेशनच्या यादीत दिले आहे. खºया लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याने नागरिकांनी त्याला आक्षेप घेतला. संतप्त महिलांनी सरपंचांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. वंचित लाभार्थी राधा अनिल उदमले या भूमीहीन असून पती अपंग आहेत. कार्ड असूनही त्यांना रेशनचे दीड वर्षांपासून धान्य दीड मिळत नाही.


सरपंचांनी घेतला काढता पाय
वाढता गोंधळ लक्षात घेऊन सरपंच माळी यांनी वाढीव यादीच्या लाभार्थ्यांसह श्रीमंतांची नावे रद्द करण्याचा ठराव केला. तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड सर्व्हेक्षण करून करण्यात येईल असे जाहिर केले. सभा बरखास्त झाल्याचे जाहीर करीत संतप्त महिलांनी पुन्हा माळी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. सरपंच माळींनी तेथून काढता पाय घेतला.
संतप्त महिलांनी अर्धा तास केला रास्तारोको
संतप्त महीलांनी ग्रामपंचायत मधून मोर्चा काढत जळगाव-औरंगाबाद महामार्गावर ठिय्या दिला. महिला ऐकण्याच्या मनस्थित नसल्याने तब्बल अर्धा तास रहदारीचा खोळंबा झाला. अखेर साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी महिलांची समजूत काढली. त्यानंतर दुपारी एक वाजता रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला. त्यानंतर नायब तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी भेट देऊन संतप्त महिलांचे म्हणणे ऐकून घेत योग्य कारवाईचे आश्वासन दिले.

 वाढीव ४२ लाभार्थ्यांच्या यादीसह श्रीमंत लाभार्थ्यांची नावे रद्द करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. योग्य प्रक्रिया राबवून गरजू लाभार्थी निवडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविला जाईल.
डिगांबर माळी, सरपंच, पाळधी

श्रीमंत व राजकारण्यांच्या नातेवाईकांना रेशनकार्डचा लाभ मिळत आहे. मात्र गरजू लाभार्थी वंचित राहत आहे. गरीबांना घरोघर जावून रेशनकार्डाचे समान वाटप करा किंवा रेशनिंग बंद करा. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकाºयांकडे जाऊन दाद मागणार आहोत.
सविता प्रकाश परदेशी, वंचित लाभार्थी.

Web Title: in gramsabha in the ration list of ration list at the palanquin of Jamner Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.