सोनेरी उच्चांक! ७१,१०० तोळा, चांदीला ‘भाव’ ८०,९०० किलो

By विजय.सैतवाल | Published: April 6, 2024 04:51 PM2024-04-06T16:51:31+5:302024-04-06T16:52:42+5:30

भाववाढीची स्पर्धा : सोने ८५०, तर चांदी १४००ने वधारली.

gold rate 71100 rs and silver price also increased in 80900rs per kg | सोनेरी उच्चांक! ७१,१०० तोळा, चांदीला ‘भाव’ ८०,९०० किलो

सोनेरी उच्चांक! ७१,१०० तोळा, चांदीला ‘भाव’ ८०,९०० किलो

विजयकुमार सैतवाल, जळगाव : सातत्याने भाववाढ होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात पुन्हा एकदा मोठी वाढ होऊन दोन्हीही मौल्यवान धातू आणखी नव्या उच्चांकीवर पोहोचले आहेत. शनिवार, ६ एप्रिल रोजी सोन्याच्या भावात ८५० रुपयांची वाढ होऊन ते ७१ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले. चांदीच्याही भावात एकाच दिवसात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८० हजार ९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.

गेल्या महिन्यात केवळ सोन्याचे भाव वाढत असताना आता सोन्यासह चांदीच्याही भावात मोठी वाढ सुरू झाली असून दोघांमध्ये भाववाढीची सध्या स्पर्धा दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच गुरुवार, ४ एप्रिल रोजी सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर शुक्रवार, ५ एप्रिल रोजी त्यात २५० रुपयांची वाढ झाली व ते ७० हजार २५० रुपये प्रति तोळा झाले. शनिवारी ही वाढ कायम राहत त्यात पुन्हा ८५० रुपयांची वाढ झाली व सोन्याने ७१ हजारांचाही पल्ला ओलांडून ते ७१ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले.

चांदीचा सर्वाधिक भाव-

दुसरीकडे गेल्या आठवड्यापासून भाववाढ सुरू झालेल्या चांदीच्याही भावात तीन दिवसांत मोठी वाढ झाली. गुरुवार, ४ एप्रिल रोजी ७९ हजार २०० रुपये प्रति किलोवर चांदी पोहोचली होती. शुक्रवार, ४ एप्रिल रोजी त्यात ५०० रुपयांची आणि शनिवार, ६ एप्रिल रोजी तर थेट एक हजार ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ८० हजार रुपयांच्या पुढे जात ८० हजार ९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. यापूर्वी अनेक वेळा चांदी ७७ व ७८ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली. मात्र, ४ एप्रिलला ७९ हजार व आता ६ एप्रिल रोजी ८० हजार हा चांदीचा मोठा टप्पा आहे.

एक तोळे सोन्यासाठी ७३ हजारांपेक्षा जास्त मोजा-

७१ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेल्या सोन्याची खरेदी करताना एक तोळा सोन्यासाठी जीएसटीसह ७३ हजार २३३ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, एक किलो चांदीसाठी जीएसटीसह ८३ हजार ३२७ रुपये मोजावे लागणार आहेत.

मागणी वाढल्याचा परिणाम-

अमेरिकन बँकिंग क्षेत्र अजूनही सावरत नसल्याने अमेरिकेसह अनेक विकसित देशांकडून सोने-चांदीची खरेदी वाढली आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.

Web Title: gold rate 71100 rs and silver price also increased in 80900rs per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.