महिनाभरात सोन्याचे भाव दोन हजारांनी घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 06:18 IST2019-04-03T06:17:42+5:302019-04-03T06:18:04+5:30

रुपया वधारल्याचा परिणाम : दर प्रति तोळा ३२ हजारांवर

Gold prices fell by two thousand in a month | महिनाभरात सोन्याचे भाव दोन हजारांनी घसरले

महिनाभरात सोन्याचे भाव दोन हजारांनी घसरले

जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्याने सोन्याच्या भावामध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. महिनाभरात सोन्याचे भाव प्रती तोळा दोन हजार रुपयांनी कमी होऊन ते ३४ हजारांवरून ३२ हजारांवर आले आहेत. चांदीचे भाव ४१ हजार ५०० रुपयांवरून ते ३९ हजारांवर आले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाल्याने तसेच सोन्याच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक वाढत असल्याने हा परिणाम झाला असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. गेल्या महिन्यात ७२ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे दर ६९.०२ रुपयांवर आले. २६ फेब्रुवारी रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ते ३३ हजारांवर आले. ९ मार्च रोजी ३२ हजार ८०० रुपयांवर आले. तेव्हापासून दररोज भाव कमी होत आहेत. तीन दिवस सोने ३२ हजारांवर कायम राहिले व २ एप्रिलला ३०० रुपयांनी वाढ होऊन ३२ हजार ३०० रुपये प्रती तोळा झाले.

लग्नसराई असल्याने मागणी वाढली
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्यामुळे सोन्याचे भाव कमी होत आहे. सध्या लग्नसराईमुळे सोने-चांदीची मागणी वाढली असून खरेदीवर परिणाम नाही.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, शहर सराफ असोसिएशन, जळगाव.

चांदीतही घसरण : सोन्यासोबतच चांदीचेही भाव कमी होत आहे. महिनाभरात हे भाव थेट अडीच हजार रुपये प्रती किलोने कमी झाले आहेत. २४ मार्चला ३९ हजार ५०० रुपये प्रती किलो व २९ मार्चला ३९ हजारांवर चांदी आली. तेव्हापासून २ एप्रिलपर्यंत हे भाव ३९ हजारांवर स्थिर आहेत.

Web Title: Gold prices fell by two thousand in a month