खोपडीचे देव उठले आता बळीराज्याची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 07:54 PM2020-11-26T19:54:47+5:302020-11-26T19:55:10+5:30

गुरुवारी कार्तिकी एकादशीला परंपरेप्रमाणे खोपडी पूजनाने देव उठवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

The god of skulls has risen | खोपडीचे देव उठले आता बळीराज्याची लगीनघाई

खोपडीचे देव उठले आता बळीराज्याची लगीनघाई

Next

संजय हिरे 
खेडगाव, ता.भडगाव :  गुरुवारी कार्तिकी एकादशीला परंपरेप्रमाणे खोपडी पूजनाने देव उठवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक उत्कंठा संपली. येथून  पुढे शेतकरी रब्बीच्या पेरणीबरोबरच घरातील उपवर मुलामुलीच्या वधु-वर संशोधनासाठी  एकच लगीनघाई सुरू होईल.
हंगाम व धार्मिक पंरपंरेची सांगड
आषाढी एकादशीला खरिपातील पेरण्या झालेल्या असतात, तर कार्तिकी एकादशीला खरिप हंगाम हाती आलेला असतो. नवीन धान्याच्या राशी, कापसाच्या रुपात घरात आलेले पांढरे सोने आदी शेतक-यांसाठी लक्ष्मी व एकूणच वैभव असते. नवीन अन्नधान्य, शेतात पिकलेला भाजीपाला, बोर, ऊस याचे सेवन आजच्या एकादशीला पूजा-अर्चा करुन मगच करण्याचा विधी आजही जोपासला जातो. ऊस किंवा ज्वारीच्या ताठ्याची झोपडीवजा खोपडी करुन तिला नवीन वस्र अलंकार घालत यात हे शेतातील वैभव ठेवून पूजा होते. मगच नवीन हंगामात निघालेल्या अन्नधान्याचे ग्रहण केले जाते.
   खोपडीचे देव उठले
कार्तिकी एकादशीनिमित्ताने गुरुवारी सकाळी खेडोपाडी घराघरांचे उंबरठे, अंगण दिव्यांनी उजळून  निघाले. संध्याकाळी गल्लोगल्ली, चौक, समाज, भाऊबंदकी मिळून  खोपडीतले देव उठवण्यात आले. श्रावण ते कार्तिक असे चातुर्मासातील चार महिने देव निद्रा घेतात, ही धार्मिक भावना आहे. या योगे खोपडीत सर्व देवादिकांना बसवत पूजाअर्चा असा विधी व खंडेरायाची तळी भरुन, पूजेसाठी आणलेला ताट, तांब्या हाती घेत ते टाळ वाजावेत तसे वाजवत, श्रीकृष्ण सावळा..! बोर, भाजी, आवळा असे म्हणत पाच प्रदक्षिणा घालून देवांना उठविण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर लहान मुलाला खोपडीत बसवून शेतमालाचे भाव कसे राहतील? याची विचारणा झाली. ऊस, बोरे, गुळ, खोबरे आदी प्रसाद वाटण्यात आला. 
एकच लगीनघाई
  खरीप हंगामातील कपाशी आदी शेतं खाली झाली आहेत. खोपडी एकादशीला रब्बी गहू, हरभरा पेरण्याचा मुहुर्त साधला जातो. यावर्षी एकाच वेळी सर्व शिवार खाली होत असल्याने मशागतीसाठी, ट्रॅक्टरला वेंटीग लिस्ट आहे. अशात घरातील उपवर मुलीमुलांसाठी स्थळ शोधमोहीम, विवाह जुळवणे आदी एकच धावपळ शेतक-यांची होणार आहे.
 आमुच्या अंगणी तुळस, देव झालेत जावई
पंरपंरेनुसार आज काही समाज व चौकातील खोपडी पूजेनंतर तुळशी विवाहांना आरंभ होईल. पुराणानुसार वृंदा अर्थात तुळशीचा विवाह  श्रीकृष्णाशी लावून दिला जातो व मगच घरातील विवाहयोग्य मुलगा, मुलगी यांच्यासाठी स्थळ शोध मोहीम सुरू होते. अंगणातील तुळशीला कन्या समजले जाते
  ज्याले नाही लेक
 त्येनी तुळस लावावी
 आपुल्या अंगणात
  देव करावे जावई...
यानुसारच तुळशीचा विवाह होतो. काही गावातून खोपडी पूजनानंतर लगेच तुळशी विवाह लावला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमेपर्यत तुळशीविवाह   चालतात. तुळशीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळेच व्रत करू एकादशी, दारी लावली तुळशी ही भावना या गीतातून व्यक्त होते.

Web Title: The god of skulls has risen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.