दैव जाणिले कुणी! हृदयविकार कुटुंबाची पाठ सोडायला तयार नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 16:30 IST2021-02-01T16:28:57+5:302021-02-01T16:30:58+5:30
घरात हृदयविकार नावाचा राक्षस घुसला. सहा महिन्यांत घरातील अगोदर वडील, दोन महिन्यांनी पत्नी व पुन्हा दोन महिन्यांनी आता आईचेही हृदयविकाराच्या राक्षसाने बळी घेतला.

दैव जाणिले कुणी! हृदयविकार कुटुंबाची पाठ सोडायला तयार नाही...
लोकमत न्यूज नेटवर्क
महिंदळे, ता. भडगाव : येथील प्रल्हाद नथ्थू देवरे यांचे अतिशय गरीब कुटुंब. घरात अठरा विश्व दारिद्र्य; पण तरीही मोलमजुरी करून आपला संसाराचा गाडा पत्नी संगीताबाईसोबत अगदी आनंदाने हाकत होते. घरात आई, वडील, पत्नी, दोन मुलं असा फारच सुखी परिवार. परंतु, या परिवाराला कुणाची दृष्ट लागली की काय किंवा नियतीला हे मान्य नसावे, म्हणून त्यांच्या घरात हृदयविकार नावाचा राक्षस घुसला. सहा महिन्यांत घरातील अगोदर वडील, दोन महिन्यांनी पत्नी व पुन्हा दोन महिन्यांनी आता आईचेही हृदयविकाराच्या राक्षसाने बळी घेतला. सहा महिन्यांत अर्धे कुटुंबच हृदयविकाराने गिळले.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी प्रल्हाद देवरे यांचे वडील नथ्थू देवरे यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुःखातून हे कुटुंब सावरत नाही व त्यांना दोन महिने पूर्ण होत नाही तोपर्यंत पत्नी संगीताबाई हिलाही त्याचप्रकारे हृदयविकाराचा तीव्र झटका बसला व त्यांचाही जागीच मृत्यू झाला. घराला घरपण आणणारी माउलीच घरातून गेल्याने पूर्ण घरच उघड्यावर आले.
घरात दोन लहान मुलं... मुलांचा सांभाळ कसा होईल, या विवंचनेत प्रल्हाद देवरे पार खचले होते. परंतु, आईने मुलाला या पत्नीविरहाच्या दुःखातून सावरले व आई सोबतीला होती. म्हणून पत्नीविरहातून सावरत जेमतेम मोलमजुरी करून संसाराचा गाडा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना ज्या आईने या दुःखातून सावरण्याचे बळ दिले, त्या आईवरही पुन्हा हृदयविकाररूपी राक्षसाची नजर गेली.
आपल्या मुलासाठी व नातवांसाठी संध्याकाळी स्वयंपाक करत असताना जनाबाई देवरे यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका बसला व त्यांचाही जागीच मृत्यू झाला.
दैव कुणी जाणिले
एकाच कुटुंबातील गेल्या सहा महिन्यांत कर्त्या तिन्ही लोकांचा दोन महिन्यांच्या अंतराने हृदयविकारानेच मृत्यू झाला. या घटनेने गावकऱ्यांना विचार करायला लावले आहे. त्यामुळे शेवटी ‘दैव कुणी जाणिले’ असे म्हणण्याची वेळ आली.