पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:51+5:302021-07-28T04:16:51+5:30
जळगाव : हुंडा देणे आणि घेणे, कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही हुंडा मागण्याचे आणि देण्याचे प्रमाण काही केल्या कमी ...

पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या !
जळगाव : हुंडा देणे आणि घेणे, कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही हुंडा मागण्याचे आणि देण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. ज्यांना मुलीच मिळत नाही, ते फुकटात लग्न करतात. खास करुन हुंड्याची पद्धत श्रीमंत लोकांमध्येच अधिक आहे. सर्व मनासारखे झाले तरी देखील लग्नानंतर हुंड्यासाठी छळ झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. नोकरी किंवा उद्योगासाठी पैशाची मागणी, कधी घर, फ्लॅट व बंगला घेण्यासाठी तर काही प्रकरणात कार घेण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत किंवा वाहनच घेऊन द्यावे यासाठी विवाहितांचा छळ होत आहे. जळगाव जिल्ह्यात २०१८ ते २०२१ या कालावधीत असे ७१९ गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत.
सध्या तर मुलींचा जन्मदर कमी आहे. लग्नासाठी मुली मिळणे अवघड झालेले आहे. अनेक समाजात तर आंतरजातीय विवाह केला जात आहे तर काही ठिकाणी मुलीच विकत आणाव्या लागत आहेत. ही परिस्थिती असताना जेथे सर्वसंमतीने विवाह जुळला तेथे लग्नात हुंड्यारुपी वस्तू मागितली जाते. या वस्तूची पूर्तता केल्यावरही लग्न काढून देण्याची वेळ येते. एक प्रकारे नवऱ्याला नवरी कुटुंबाकडून विकतच घेतले जाते. हे सर्व झाल्यानंतरही मुलीचा छळ होतोच. बऱ्याचदा छळाची कारणे वेगळी असतात पण गुन्हा दाखल करताना प्रामुख्याने पैसा, घर व कार अशीच कारणे दिली जातात.
अशिक्षितापासून उच्च शिक्षितांपर्यंत
हुंडा घेणे व देणे हे काम अशिक्षितापासून उच्च शिक्षितांपर्यंत सर्वच जण करीत आलेले आहेत. सर्वांची संमती असल्याने या ठिकाणी कायद्याची भीती कोणालाच नाही. खेडेगाव असो शहर, महानगर प्रत्येक ठिकाणी हुंड्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोणी भेट स्वरुप वस्तू घेते तर कोणी वाहन, फ्लॅट घेतात. लग्न ठरवितानाच त्याची बोली केली जाते. खास करुन श्रीमंतांनाच हुंड्याचा लोभ अधिक असल्याचे दाखल झालेल्या गुन्ह्यांवरुन दिसून आलेले आहे. काही कुटुंबाला तर हुंडा पद्धतच मान्य नाही. मुलीने संसार चांगला करावा हीच अपेक्षा बाळगून असतात.
मुलींचे माता-पिताही जबाबदार
हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी मुलीचे माता-पिता हुंडा देताच, किंबहुना मुलांच्या कुटुंबीयांकडून तशी मागणीच होते. नाही झाली तरी मुलीच्या सुखासाठी काही तरी देण्याची तयारी मुलीच्या वडिलांकडून दाखविलीच जाते. त्याला ते परंपरा व पद्धत अशी नावे देतात.
- सीमा विजय पाटील, पिंप्राळा
नवी पिढी बदलतेय...
मी लग्नात हुंडा घेतला नाही किंवा कोणती मागणी केली नाही. मुलगी चांगली व संस्कारी असावी अशी अपेक्षा होती व त्यानुसार तशी मुलगी मिळाली. हुंडा पद्धत मी मानत नाही.
-सचिन पाटील, नवविवाहित तरुण
हुंडा पद्धत समाजाने बंद करायला हवी. हुंडा म्हणजे एक प्रकारे व्यवहार, सौदा असतो. स्वेच्छेनेच याचा समाजाने स्वीकार करायची गरज आहे. कायदे देखील कडक होणे गरजेचे आहे.
- गिरीश शंकपाळ, तरुण
हुंड्यासाठी छळाचे गुन्हे
२०१८ - २८२
२०१९- २१८
२०२०- २१९
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
१) देशात हुंडाबळी कायदा अस्तित्वात असला तरीदेखील या कायद्याची भीती दिवसेंदिवस समाजात कमी होताना दिसत आहे. हुंड्यामध्ये थेट रो-हाऊस, दुकान, रिक्षा, कार खरेदीकरिता हजारो ते लाखो रुपयांची मागणी नवविवाहितेकडे माहेरुन रक्कम आणून देण्यासाठी केली जाते.
२) अनेकदा तर लग्न जमविताना हुंड्यावर चर्चा होते. वधूपक्षाकडे वरपक्षाकडून सर्रासपणे रोख रक्कम, दागदागिने, वाहनांच्या स्वरुपात हुंडा मागितला जातो.
३) मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत करत असले तरीदेखील हुंड्याची मागणी लग्न जमविण्यापूर्वी आजही केली जाते. जिल्ह्यातील गावपातळीवरच नव्हे तर शहरामध्ये सुद्धा अशापद्धतीने हुंड्यासाठी बोली लागते.