जळगावजवळ भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 16:10 IST2018-03-01T16:10:59+5:302018-03-01T16:10:59+5:30
शिरसोली रस्त्यावर झालेल्या अपघातात एक विद्यार्थिनी गंभीर जखमी

जळगावजवळ भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १ : महाविद्यालयातून सुटी झाल्यानंतर घरी येत असताना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने करुणा रेनॉल्ड लवणका (वय १८, रा.महाबळ, जळगाव) ही डिप्लोमाची विद्यार्थिनी ठार झाली तर साक्षी राजेंद्र नारखेडे (वय १७ रा.समर्थ कॉलनी, जळगाव) ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. साक्षी हिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजता शिरसोली रस्त्यावरील हाजी मलंगशहा बाबा दर्गाजवळ झाला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, करुणा लवणका व साक्षी नारखेडे या दोन्ही विद्यार्थिनी शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक डिप्लोमाच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होत्या. गुरुवारी महाविद्यालयातून सुटी झाल्यानंतर दोघी विद्यार्थिनी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.एच.३०७८) घरी येत असताना दर्गाजवळ उताराकडून भरधाव वेगाने विना क्रमांकाचे ट्रॅक्टर येत होते. या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने करुणा व साक्षी दोन्ही लांब फेकल्या गेल्या. करुणा हिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर या विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी करुणाला मृत घोषीत केले तर साक्षीला तेथून खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.