तापी नदी पात्रात बुडून बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:14+5:302021-09-13T04:17:14+5:30

भुसावळ : शहरातील झेडटीएस परिसरातील तापी नदीवर असलेल्या रेल्वे पुलाजवळ सायकल घेऊन फिरायला गेलेल्या बहीण-भावापैकी ११ वर्षीय बहिणीचा ...

Girl drowns in Tapi river basin | तापी नदी पात्रात बुडून बालिकेचा मृत्यू

तापी नदी पात्रात बुडून बालिकेचा मृत्यू

भुसावळ : शहरातील झेडटीएस परिसरातील तापी नदीवर असलेल्या रेल्वे पुलाजवळ सायकल घेऊन फिरायला गेलेल्या बहीण-भावापैकी ११ वर्षीय बहिणीचा तापी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला तर १२ वर्षीय भावाला वाचविण्यात यश आले आहे. या घटनेने झेडटीसी परिसरात शोककळा पसरली. बालिका नदी पात्रात बुडाल्यानंतर जवळपास ७ तास तिचा नदी पात्रात शोध घेण्यात आला. सायंकाळच्या सुमारास तिचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

येथील झेडटीएस परिसरातील रहिवासी मनीषकुमार यादव (रा. आर.बी. ३ इन्ट्रक्टर कॉलनी, ब्लू स्टार नवदुर्गा मंडळाजळ) यांची अनन्या (११ वर्षे) व आर्यन (१२ वर्षे) ही मुले सायकल फिरवत रेल्वे मार्गाने तापी नदीवरील रेल्वे पुलाजवळ पोहोचले होते. या वेळी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नदी पात्रात दीड दिवसाचा गणपती बुडविण्यासाठी काही भाविक नदी पात्रात आले होते. या वेळी हे दोघे बहीण-भाऊ नदी पात्रात उतरले होते. या वेळी किनाऱ्यावरून अनन्या हिचा पाय घसरला असता तिने मदतीसाठी भाऊ आर्यनला हात दिला. त्यानेही तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी जास्त असल्यामुळे ते दोघेही पाण्यात गटांगळ्या खात असताना जवळच असलेल्या भाविकांना हे दिसले.

या वेळी श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाचे शिक्षक निवृत्ती नथ्थू पाचपांडे (वय ५७) यांनी तत्काळ नदी पात्रात उतरत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र केवळ आदित्यलाच वाचविण्यात यश आले. अनन्या मात्र आढळून आली नाही.

नदी पात्रात शोधाशोध

घटना घडताच आपत्ती व्यवस्थापन समिती व तालुका पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या वेळी पो.नि. विलास शेंडे, एपीआय रूपाली चव्हाण, एएसआय श्यामकुमार मोरे, हे. कॉ. प्रेम सपकाळे, पो.कॉ. जितेंद्र साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाने नदी पात्रात अनन्याचा शोध घेतला असता जवळपास सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ५ वाजता तिचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, अनन्याच्या पश्चात आई, वडील, आर्यनसह अन्य एक भाऊ असा परिवार आहे. अनन्या व आर्यन येथील रेल्वे स्कूलमध्ये ६ वीच्या वर्गात शिक्षण घेत होते. या घटनेनंतर झेडटीएस परिसरात शोककळा पसरली आहे.

दोघे बहीण व भाऊ हे नदी पात्राकडे जात असताना संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयातील शिक्षक निवृत्ती पाचपांडे यांनी या दोघांना कुठे जात आहात, याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर पाचपांडे गणपती विसर्जनासाठी नदी पात्राकडे रवाना झाले होते.

याबाबत तालुका पोलिसात मनीषकुमार यादव यांच्या खबरीवरून नोंद करण्यात आली.

आधी दोघे गेले होते दवाखान्यात

या घटनेत अनन्याच्या डोक्याला जखम झाली असल्यामुळे दवाखान्यात उपचारासाठी दोघे बहीण-भाऊ गेले होते. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर मुलगी पाण्यात बुडाल्याची चर्चा घरी कानी पडली. तपास पो.नि. विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.

Web Title: Girl drowns in Tapi river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.