गिरीष महाजन यांनी जामनेरला बारामती करण्याचे स्वप्न पूर्ण करावे - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:48 IST2019-01-17T19:47:42+5:302019-01-17T19:48:13+5:30

ईश्वरलाल जैन यांच्या वक्तव्याचाही निषेध

Girish Mahajan should fulfill his dreams of Baramati - the demands of NCP | गिरीष महाजन यांनी जामनेरला बारामती करण्याचे स्वप्न पूर्ण करावे - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

गिरीष महाजन यांनी जामनेरला बारामती करण्याचे स्वप्न पूर्ण करावे - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जामनेर : जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आधी जामनेरला बारामती करण्याचे दाखविलेले स्वप्न पूर्ण करावे नंतरच बारामती जिंकून दाखविण्याची वल्गना करावी, असे आवाहन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिले आहे. या वेळी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवार १९ रोजी जामनेरला येत असलेल्या परिवर्तन यात्रेची माहिती दिली. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. परिवर्तन यात्रेनिमित्त शनिवारी दुपारी ३ वाजता वाकी रोडवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील ९० गावांत पाणी टंचाईची स्थिती असणे हे जलसंपदा मंत्र्यांसाठी शोभनीय नाही. राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी काळखेडे येथे आपण जामनेर तालुका वगळून राष्ट्रवादीसाठी काम करु असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य कार्यकर्त्यांची भावना दुखावणारे आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत या वक्तव्याचा निषेध करुन त्यांच्यावर श्रेष्टींनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले की, जैन यांनी भाजपमध्येच प्रवेश करावा. यावेळी डॉ.प्रशांत पाटील, प्रल्हाद बोरसे उपस्थित होते.

Web Title: Girish Mahajan should fulfill his dreams of Baramati - the demands of NCP