चाळीसगावच्या 'सर्वोदय'साठी चुरशीचे घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 22:55 IST2021-02-21T22:55:02+5:302021-02-21T22:55:50+5:30
सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत शनिवार अखेर १९ जागांसाठी ८३ अर्ज दाखल झाले आहे.

चाळीसगावच्या 'सर्वोदय'साठी चुरशीचे घमासान
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर शनिवार अखेर १९ जागांसाठी ८३ अर्ज दाखल झाले आहे. मंगळवारी छाननी होणार असून आज नामनिर्देशपत्र भरण्याचा शेवटचा दिवस आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने सर्वोदयच्या वर्चस्वासाठी चुरशीचे घमासान होणार हे स्पष्ट आहे.
ब्रिटिश कालखंडातच सर्वोदय शिक्षण संस्थेने चाळीसगावच्या पंचक्रोशीत ज्ञानाचा दीप पेटविला. पुढे संस्थेचा शाखाविस्तार पाचोरा तालुक्यातही झाला. शिक्षणाची शतकोत्तर परंपरा असणाऱ्या या संस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी सहा दिवसात ८३ इच्छुकांनी दंड थोपटले आहे. सोमवारी अजून अर्ज दाखल झाल्यास इच्छुकांचे शतक पूर्ण होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
१९ जागांसाठी धुरळा
सर्वसाधारण प्रवर्गासाठी १४, अनुसूचित जाती - जमाती दोन, भटक्या विमुक्त एक, इतर मागास एक, महिलांसाठी दोन अशा १९ जागांसाठी ही लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रारंभीच क्रियाशील व अक्रियाशील सभासदांचा वाद पेटला. ४६८० मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. २१ मार्च रोजी मतदान तर २२ रोजी निकालाच्या विजयाचे फटाके फुटतील. मंगळवारी अर्ज छाननी होईल. २४ ते १० मार्चपर्यंत माघारीसाठी वेळ देण्यात आला आहे. अंतिम उमेदवारांची यादी १२ मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे.
दुरंगी लढत होणार
संस्थेचे विद्यमान चेअरमन विकास पंडित पाटील व सचिव उदेसिंग मोहन पाटील यांचे पॅनल असून त्यांना संस्थेचे संचालक व उंबरखेडेचे लोकनियुक्त सरपंच केदारसिंग पाटील व संचालक रवींद्र चुडामण पाटील यांचे पॅनल आव्हान देण्याच्या तयारीत आहे. आखाड्यातील खरे चित्र १२ मार्च रोजी स्पष्ट होणार आहे.
मातब्बरांचे अर्ज दाखल
गेल्या सहा दिवसात संस्थेचे विद्यमान सचिव उदेसिंग मोहन पाटील, आनंदा पाटील, नगरसेवक भगवान अमरसिंग पाटील यांच्यासह विद्यमान संचालक केदारसिंग पाटील, रवींद्र चुडामण पाटील, डॉ. उत्तमराव महाजन, प्रा. तुषार निकम यांनी अर्ज दाखल केले आहे. विद्यमान चेअरमन विकास पंडित पाटील हे आज सोमवारी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करणार आहे.