आज गौरींचे आगमन
उत्साह : तयारी पूर्णत्वाकडे
नशिराबाद : अनेक घरांमध्ये तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरीचे स्वागत करण्याची तयारी पूर्णत्वाकडे आलेली आहे. विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनानंतर सुख-समृद्धी व वैभवाचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी गौरींचे आज रविवारी आगमन होणार आहे. गौरीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर घरांमध्ये साहित्य सजावट आरास करण्यासाठीची लगबग सुरू आहे. गौरी बसवण्याच्या पद्धती, अनेक घरांमध्ये चालीरीती विभिन्न असल्या तरी गौरी स्थापनेबाबतचा उत्साहात सर्वत्र सारखाच आहे. आज रविवारी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनंतर गौरीचे आवाहन होणार आहे. गौरी सण हा नक्षत्र प्रधान आहे. अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन व महानैवेद्य तर मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याचा प्रघात आहे. काही ठिकाणी उभ्या गौरी, कुठे खड्यांच्या गौरी, कुठे माठावर, बसविल्या जात असल्याने परंपरेनुसार सर्व घरांमध्ये गौराईच्या आगमनाची लगबग दिसून येत आहे. गौरी स्थापनेच्या जागी आरास सजावट करण्याचे कार्य घरोघरी दिसून आले. विद्युत रोषणाईची पूर्वतयारी करतानाची लगबग घरोघरी सुरू होती. चैतन्य व उत्साहवर्धक वातावरणाने भक्तीची ज्योत तेवत होती. महालक्ष्मीची आगमन स्थापना झाल्यानंतर अनेक ठिकाणी सायंकाळी मंत्रजागरण शांतीपाठ करण्याचा प्रघात आहे.
----
दुकानांमध्ये गौरीच्या मूर्तींची सजावट करण्याचे काम शनिवारी विक्रेत्यांकडून सुरू होते.