गणेश : निसर्ग शक्तीचे विराट रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:43+5:302021-09-12T04:19:43+5:30
श्रावण महिना सुरू झाला की, पृथ्वीतलावरील सृष्टिसौंदर्य नजरेत भरण्यासारखं असतं. जिकडे-तिकडे हिरवळ, वृक्ष-वेली, फुलझाडे फळझाडे बहरलेल्या सृष्टीनं जणू काही ...

गणेश : निसर्ग शक्तीचे विराट रूप
श्रावण महिना सुरू झाला की, पृथ्वीतलावरील सृष्टिसौंदर्य नजरेत भरण्यासारखं असतं. जिकडे-तिकडे हिरवळ, वृक्ष-वेली, फुलझाडे फळझाडे बहरलेल्या सृष्टीनं जणू काही तिने भरजरी हिरवा शालू परिधान केलेला आहे. ती एका नववधूसारखी नटलेली आहे, असेच चित्र सगळीकडे बघायला मिळते आणि त्यातच सगळीकडेच पावसाचे आगमन होऊन जवळजवळ निम्मा वर्षाऋतू संपण्यात आलेला असतो.
श्रावण महिन्याच आगमन खूप खूप सुखावह असते. कधी ऊन तर कधी पावसाच्या मुसळधार सरी तर कधी रिमझिम संथ गतीने बरसणाऱ्या सरी हिरव्यागार पानाफुलांनी बहरलेली सृष्टी मनाला गारवा देऊन जाते आणि श्रावण मास संपतो न संपतो तोच ढोल-ताशांचा आवाज दुमदुमू लागतो. मोठ्या आनंदाने, स्फूर्तीने आणि प्रत्येकाच्या एक नवचैतन्य संचारल्याने मंगलमय वातावरणात लाडक्या गणपती बाप्पाची घराघरात,
गल्लीगल्लीत स्थापना केली जाते आणि या गणपती बाप्पाच्या आगमनाने घराघरात सुखाचे, मांगल्याचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण होते.
स्वातंत्र्याची चळवळ सुरू असताना भारतातील जनतेवर जातीयतेचा फार मोठा पगडा होता. हीच गोष्ट टिळकांच्या लक्षात आली. इंग्रजांशी लढा द्यायचा असेल तर सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र यायला हवेत. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवासारखा दुसरा पर्याय नाही, यासाठी त्यांनी पुण्यात सन १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच जण जातपात विसरून एकत्र येऊन दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू लागले. गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते.
आज सबंध भारतात तर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातोच. परंतु जे भारतीय बांधव आहेत त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा ते ज्या देशात राहतात तेथे सारे भारतीय एकत्र येऊन दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करतात. कुठल्याही शुभारंभाच्या वेळी, मंगलकार्याच्या वेळी ज्या देवतेचे पूजन केले जाते, ती देवता म्हणजे श्री गणेश देवता. गणेशाला बुद्धीची देवता म्हणूनही संबोधले जाते. कलेची देवताही गणपतीच. कुठलेही काम पूर्ण करण्याची जी शक्ती प्रदान करते, ती देवता म्हणजे गणपती. म्हणूनच गणेशाला अग्रपूजेच्या मानाचे स्थान आहे. गणपती आपल्याला पूर्ण क्षमतेने काम करण्याची आणि यश मिळवण्यासोबतच संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचे गणपतीच प्रतिनिधित्व करतो. गणपती अज्ञानावर विजय मिळविण्यासाठी पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी प्रेरणाही देतो. भगवान गणेश हे निसर्गाच्या शक्तीचे विराट रूप आहे.
श्रीगणेशाची पूजाअर्चा करून गणपती बाप्पाला साकडे घालू या...सबंध जगाला कोरोना या संसर्गजन्य रोगापासून मुक्ती मिळू दे आणि सर्वांना भयमुक्त होऊन पुनश्च एकदा या पृथ्वीतलावर रामराज्य येऊ दे.