'सामनावीर' पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच 'त्या' खेळाडूची प्राणज्योत मालवली; मैदानातच घेतला अखेरचा श्वास
By अजय पाटील | Updated: December 5, 2025 23:41 IST2025-12-05T23:39:55+5:302025-12-05T23:41:06+5:30
१८ चेंडूत ४४ धावा कुटणाऱ्या खंडवा येथील खेळाडूचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी अंत

'सामनावीर' पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच 'त्या' खेळाडूची प्राणज्योत मालवली; मैदानातच घेतला अखेरचा श्वास
अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : शहरातील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या गवळी प्रीमियर लीगच्या उत्साहावर शुक्रवारी रात्री एका अत्यंत दुर्दैवी घटनेने विरजण पडले. शुक्रवारी लीगचा पहिलाच दिवस असताना, सातवा सामना संपल्यानंतर खंडवा संघाचा अष्टपैलू खेळाडू गणेश यादव (३८ रा. खंडवा) यांचा मैदानातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, ज्या सामन्यात त्यांनी वादळी खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला, त्या सामन्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
अष्टपैलू कामगिरी ठरली शेवटची..
शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. गणेश यादव यांनी या स्पर्धेतील आपला पहिला आणि दुर्दैवाने शेवटचा सामना खेळताना नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यांनी अवघ्या १८ चेंडूत ४४ धावांची आतषबाजी केली, तसेच गोलंदाजी करताना दोन महत्त्वपूर्ण विकेट्स देखील घेतल्या. या अष्टपैलू कामगिरीमुळे पंचांनी आणि आयोजकांनी त्यांची निवड 'सामनावीर' म्हणून केली होती.
पुरस्काराची घोषणा आणि काळाचा घाला
सामना संपल्यानंतर बक्षीस वितरणाची तयारी सुरू होती. गणेश यादव हे सामनाविराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सज्ज असतानाच त्यांना मैदानावर हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले. उपस्थित खेळाडू आणि आयोजकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय
या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण क्रीडा विश्वात आणि गवळी समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश यादव यांच्या निधनानंतर स्पर्धेच्या आयोजकांनी आणि गवळी समाजाच्या खेळाडूंनी तातडीने बैठक घेऊन उर्वरित 'गवळी प्रीमियर लीग' रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयोजकांनी 'लोकमत'शी बोलताना दिली आहे.