जळगावात पोलिसांनी रोखले महिलेचे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:58 IST2018-06-06T14:58:07+5:302018-06-06T14:58:07+5:30
संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या नथाबाई रमजान तडवी (वय ५०, रा.प्रजापत नगर, जळगाव) या महिलेचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्याची तयारी पोलिसांनी हाणून पडल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी प्रजापत नगरात घडला.

जळगावात पोलिसांनी रोखले महिलेचे अंत्यसंस्कार
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.६ : संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या नथाबाई रमजान तडवी (वय ५०, रा.प्रजापत नगर, जळगाव) या महिलेचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्याची तयारी पोलिसांनी हाणून पडल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी प्रजापत नगरात घडला. पोलिसांनी अंत्यसंस्कार रोखल्याने प्रजापत नगरात खळबळ उडाली. या महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयतातील शवागारगृहात ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नथाबाई तडवी या महिलेची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडली. चहापाणी झाल्यानंतर ही महिला परत झोपली. साडे दहा वाजता पतीने उठविण्याचा प्रयत्न केला,परंतु ती उठली नाही. त्यामुळे रिक्षातून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ११ वाजता मृत घोषीत केले. तेथून पतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी न नेता थेट घरीच नेला. सायंकाळी अंत्यसंस्काराची तयारी होत असतानाच पोलीस तेथे धडकले.
नथाबाई व तडवी यांनी पाच वर्षापूर्वी न्यायालयात आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. बुधवारी विवाहाची कागदपत्रे पडताळणी केली जाईल तसेच शवविच्छेदन अहवालात काही आक्षेपार्ह आढळून आले तर दोषीविरुध्द कारवाई केली जाईल अशी माहिती निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी दिली. दरम्यान, नथाबाई हिला पहिल्या पतीपासून दोन अपत्ये आहेत.