पावसासाठी गांधली येथे जिवंत माणसाची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:41+5:302021-07-31T04:17:41+5:30
अमळनेर : जुलै महिना संपला तरी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने व्यथित झालेल्या गांधली गावकऱ्यांनी निसर्गावर व परमेश्वरावर ...

पावसासाठी गांधली येथे जिवंत माणसाची अंत्ययात्रा
अमळनेर : जुलै महिना संपला तरी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने व्यथित झालेल्या गांधली गावकऱ्यांनी निसर्गावर व परमेश्वरावर श्रद्धा ठेवून पावसाला साकडे घालण्यासाठी जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढून शेतकऱ्याला दयनीय अवस्थेचे जणू दर्शन घडवित आतातरी पड रे पाण्या असे साकडे घातले.
गेल्यावर्षी जुलैअखेर तालुक्यात सरासरी ४६९.३६ मिमी पाऊस पडला होता. यंदा मात्र फक्त ११०.०५ मि.मी. पाऊस पडला आहे. सरासरीच्या २५ टक्केदेखील पाऊस न पडल्याने उत्पन्न हातचे जाण्याची वेळ आली आहे. दुबार पेरणी करूनही वरुणराजाने कृपा केली नाही म्हणून अक्षरशः जुगार लावल्याप्रमाणे काहींनी तिबार पेरणी केली आहे. मात्र दररोज ढगाळ वातावरण दिसते; परंतु एक थेंबही पाऊस पडत नाही म्हणून शेतकरी चिंतित आहे.
शेतकरी हवालदिल
खर्च करूनही हातात काहीच येणार नाही. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जिवंत माणसे मरण्याची वेळ आली आहे हे परमेश्वराच्या, निसर्गाच्या निदर्शनास यावे आणि त्याने कृपा करावी व धो-धो पाऊस पाडावा यासाठी जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढण्याची पद्धत प्राचीन काळापासून सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगातही गांधलीकरांनी अखेर श्रद्धेपोटी गावातून जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला. गावातील तरुणांनी एकत्र येत भिकन पाटील या तरुणाला तिरडीवर झोपवले, नामदेव महाजन याला मडकेधरी केले. वैभव माकडे, नाना पारधी, भैय्या पाटील, अशोक पाटील, योगेश पाटील खांदेकरी झाले होते.
गावकरी आले एकत्र
सरपंच नरेंद्र पाटील, दीपक पाटील, शशिकांत पाटील, मनोहर पाटील यांच्यासह अनेक गावकरी, तरुणांनी सहकार्य केले. परमेश्वराला गावचे संकट कळावे, शेतकऱ्यांच्या व्यथा समजाव्यात आणि आता तरी पाऊस पडावा म्हणून गावाच्या मारुती मंदिरापासून वाजंत्री वाजवत गावातून अंत्ययात्रा काढली. मृत्यूनंतर जसा आक्रोश केला जातो तसा मोठमोठ्याने आक्रोश केला जात होता. रस्त्यात विसावादेखील घेण्यात आला आणि संकट गावाबाहेर पळावे म्हणून अंत्ययात्रेचा समारोप गावाबाहेर करण्यात आला.
——-
जिवंत माणसाची अंत्ययात्रा हे शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे रूप आहे. काहीही करून पाऊस पडावा म्हणून भोळ्या जनतेने पारंपरिक पद्धतीने श्रद्धेपोटी हा प्रयोग केला आहे.- नरेंद्र पाटील, सरपंच , गांधली, ता. अमळनेर