जळगाव : रविवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे मेहरुण तलावाचा मुख्य जलस्रोत असलेला अंबरझरा तलाव पूर्ण भरला आहे. त्यामुळे या तलावातून पाटचारीद्वारे मेहरुण तलावाकडे पाण्याचा विसर्ग जोराने सुरू आहे. येत्या आठवडाभरात मेहरुण तलाव हा १०० टक्के भरला जाईल, अशी शक्यता पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
यंदा सुरुवातीपासून शहर व परिसरात पावसाचा जोर कमी असल्यामुळे, ऑगस्टअखेर मेहरुण तलावात ४० ते ५० टक्क्यांपर्यंतच साठा झाला होता. त्यामुळे मेहरुण तलाव यंदा भरणार की नाही, अशी शक्यता पर्यावरणप्रेंमीमधून व्यक्त होत होती. मात्र, या आठवड्यात आणि शनिवारी मध्यरात्री शहरासह नेरी व कुसुंबा या भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे अंबरझरा तलावाच्या पाणीपातळीत अधिकच वाढ होऊन, हा तलाव पूर्ण भरला आहे. मेहरुण तलावाचा एकमेव जलस्रोत अंबरझरा तलावच आहे. हा तलाव भरल्यावर मेहरुण तलाव भरतो. आता हा तलाव भरल्यामुळे मेहरुण तलावातही पाण्याचा साठा वाढत आहे.
इन्फो :
आठवडाभरात तलाव पूर्ण भरणार
शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे अंबरझरा तलाव भरल्याने, या तलावातून मेहरुण तलावाकडे वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच अजूनही नेरी-कुसुंबा, चिंचोली या भागातून अंबरझरा तलावाकडे पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. दरम्यान, यंदा पावसाळ्यापूर्वी अंबरझरा तलावाकडून मेहरुण तलावाकडे येणाऱ्या पाटचारीतील गाळ काढून स्वच्छता केल्यामुळे, विना अडथळा हे पाणी वाहत आहे. त्यामुळे आठवडाभरात मेहरुण तलाव पूर्ण भरणार असल्याची शक्यता पर्यावरणप्रेमी तथा मराठी प्रतिष्ठानचे सचिव विजय वाणी, अध्यक्ष जमील देशपांडे, विश्वासराव मोरे, राहुल जोशी, आदी पर्यावरणप्रेंमीकडून व्यक्त होत आहे.
इन्फो :
जळगावकरांची तलाव परिसरात सकाळपासून गर्दी
शनिवारच्या मध्यरात्रीच्या मुसळधार पावसामुळे मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे, नागरिकांनी मेहरुण तलावाच्या परिसरात सकाळपासून गर्दी करताना दिसून आले. तसेच रविवारी सुट्टी असल्यामुळे अनेक नागरिक कुटुंबासह तलाव परिसरात फिरताना दिसून आले. सध्या हा हिरवाईने नटलेला असल्यामुळे, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.