संगमनेरच्या फरार कैद्यांना जामनेर येथे अटक, शेळगावातील शेतात होते लपलेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 21:26 IST2023-11-09T21:26:24+5:302023-11-09T21:26:38+5:30
लपण्यासाठी त्यांनी शेळगाव येथील शेताचीच का निवड केली असावी, याचे गूढ कायम आहे.

संगमनेरच्या फरार कैद्यांना जामनेर येथे अटक, शेळगावातील शेतात होते लपलेले
मोहन सारस्वत
जामनेर (जि. जळगाव) : संगमनेर येथील कारागृहातून पळालेल्या चारही आरोपींना शेळगाव (ता. जामनेर) येथील एका शेतातून अटक करण्यात आली. ते एका शेतात लपले होते. अहमदनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. या माहितीला जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी दुजोरा दिला.
राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल, अनिल छबू ढोले, मच्छिंद्र मनाजी जाधव अशी या चार फरार कैद्यांची नावे आहेत. हे चार जण आणि त्यांना मदत करणारे पाच ते सहा संशयितांना नगर एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.संगमनेर येथून पळालेल्या कैद्यांनी नंबरप्लेट नसलेली गाडी वापरल्याचा संशय आहे. त्यांच्याकडील वाहन धुळ्यानजीक नादुरुस्त झाल्याने त्यांनी ते त्याच ठिकाणी सोडून पळ काढला.
जळगावच्या दिशेने निघालेले हे फरार कैदी शेळगाव (ता. जामनेर) येथील एकाच्या शेतात लपल्याची माहिती नगर एलसीबीच्या पथकास मिळाली. गुरुवारी दुपारी त्यांनी शेताला चहूबाजुंनी वेढा घालत त्यांना अटक केली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कैद्यांना मदत करणारा तो कोण याची उत्सुकता आहे. लपण्यासाठी त्यांनी शेळगाव येथील शेताचीच का निवड केली असावी, याचे गूढ कायम आहे.