याबाबत निवेेेदनात त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही बचत गटांवर एकात्मिक बाल विकास प्रकल्प (नागरी) भुसावळ अंतर्गत असलेल्या चाळीसगाव येथील अंगणवाड्यांना गरम व ताजा आहार पुरविण्याचे काम मागील बऱ्याच वर्षांपासून संबंधित कार्यालयामार्फत सुरू होते. मात्र, धुळे येथील बोगस पुरवठादार संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या दोन्ही बचत गटांच्या अध्यक्षा, सचिव व सदस्यांच्या खोट्या सह्या करून आणि त्या बचत गटांमध्ये धुळे येथील सधन कुटुंबाच्या पुरुषांच्या मदतीने त्याच कुटुंबातील महिलांची नावे समाविष्ट करून घेतली आहेत.
नियमाप्रमाणे चाळीसगाव येथील शहरी अंगणवाडीला पुरवठ्याचे काम स्थानिक बचत गटाला देण्यात यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. याउलट या बचत गटात धुळे येथील महिलांचा समावेश करण्यात आला. वास्तविक या गटात चाळीसगाव येथील स्थानिक महिलांचा समावेश असणे गरजेचे होते. चाळीसगावच्या या दोन्ही बचत गटांत धुळ्याच्या महिलांचा समावेश कसा केला गेला, याची शहानिशा होणे गरजेचे आहे. अशाप्रकारचे बरेच काम धुळे येथील बोगस पुरवठादाराने संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप दिलेल्या प्रसिद्धिपत्रात नमूद करण्यात आले आहे.
बचत गटाच्या खऱ्या सभासदांना अंधारात ठेवून बचत गटाच्या सभासदांची आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन धुळे येथील बोगस पुरवठादार, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व कर्मचारी (नागरी) भुसावळ, जि. जळगाव यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अध्यक्षा लता अग्रवाल यांनी केली आहे.