फायरींगला निघाले अन् पिस्तुलसह चौघे अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 13:03 IST2020-07-28T13:02:49+5:302020-07-28T13:03:32+5:30
जळगाव : गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतूस घेऊन जंगलात फायरींगला जात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना ...

फायरींगला निघाले अन् पिस्तुलसह चौघे अडकले
जळगाव : गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतूस घेऊन जंगलात फायरींगला जात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना शिरसोली येथील आकाशवाणी केंद्राच्या परिसरात रस्त्यावर पकडले. सोमवारी सकाळी १० वाजता हा प्रकार घडला.
नरेश रवींद्र मराठे (२१), रवींद्र सिताराम अस्वार (२०), सागर सुधाकर पवार (२१ सर्व रा.शिरसोली) व आकाश अरुण जोशी (२४, कंवर नगर, जळगाव) अशी या अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत.
शिरसोली येथील नरेश मराठे या तरुणाच्या कमरेला सतत गावठी पिस्तुल असते व ते पिस्तुल घेऊन तो त्याच्या तीन मित्रासह आकाशवाणी केंद्राकडे मोकळ्या जागेत फायरींगला जात असल्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांना मिळाली. यानंतर आकाशवाणी केंद्राच्या परिसरात पोलिसांनी या चारही जणांना अडवले व त्यांची चौकशी केली असता पोलिसांना मिळालेल्या नावांची खात्री झाली. नरेश याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पिस्तुल व पॅँटच्या खिशात तीन जीवंत काडतूस मिळून आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद लाडवंजारी, राजेश मेढे, संजय हिवरकर व किरण धनगर या चार कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
पिस्तुल व काडतूस कुठून घेतल्याबाबत चौकशी केली असता आकाश जोशी याने दिल्याचे उघड झाले. हे पिस्तुल चालते की नाही याची चाचपणी करण्यासाठी आम्ही जंगलात जात होतो, असे त्यांनी तपासात सांगितले. दरम्यान, या चौघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव व भुसावळात दिवसेंदिवस गावठी पिस्तुलची तस्करी वाढत असल्याचे वारंवार होणाºया कारवायांवरुन सिध्द होत आहे.