जळगावात कोळी बांधवांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; अडचणी सोडवण्यासाठी समन्वय समिती स्थापन
By विलास बारी | Updated: November 4, 2023 23:19 IST2023-11-04T21:45:39+5:302023-11-04T23:19:05+5:30
पालकमंत्र्यांची मध्यस्थी

जळगावात कोळी बांधवांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; अडचणी सोडवण्यासाठी समन्वय समिती स्थापन
जळगाव : जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोळी समाजबांधवांचे गेल्या २५ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मध्यस्थीनंतर शनिवारी दोन महिन्यांसाठी स्थगीत करण्यात आले.
यावेळी आमदार रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रभाकर सोनवणे, उपोषणकर्ते उपस्थित होते. दोन महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास स्थगीत आंदोलन पुन्हा सुरु करण्याचा इशारा यावेळी दिला.
समिती स्थापन
कोळी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रांताधिकाऱ्यांकडून जात प्रमाणपत्र देण्याबाबत अडचणी होत्या. सात प्रांतांनी जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे.
पालकमंत्री म्हणून समाजाच्या पाठीशी राहील,असे मंत्री पाटील यांनी सांगितले. धुळ्याचे जात पडताळणी कार्यालय जळगावला मंजूर करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शासनाच्या सूचनेनुसार प्रशासनाची सहकार्याची भूमिका असेल, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.