अमळनेर तालुक्यात दुष्काळाची पहिली कळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:45+5:302021-07-14T04:19:45+5:30
अमळनेर : जुलै महिना अर्धा उलटला तरी पावसाने अजून समाधानकारक आगमन केलेले नाही. अपेक्षित पावसाच्या निम्म्यापेक्षा कमी ५१.३ ...

अमळनेर तालुक्यात दुष्काळाची पहिली कळ
अमळनेर : जुलै महिना अर्धा उलटला तरी पावसाने अजून समाधानकारक आगमन केलेले नाही. अपेक्षित पावसाच्या निम्म्यापेक्षा कमी ५१.३ मि.मी. पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत, तर अनेकांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आल्याने दुष्काळ सदृश परिस्थितीवर उपाययोजना करावी, अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
अमळनेर तालुक्यात जानेवारी ते डिसेंबरअखेर सरासरी पर्जन्यमान ६७०.७१ मि.मी. असून जून ते सप्टेंबर खरीप हंगामातील जून महिन्यात ११४.८३मि.मी. तर जुलै महिन्यात १८५.६१ मि.मी. असा एकूण ३००.४४ मि.मी. अपेक्षित असताना १० जूनपर्यंत फक्त ४१.५० मि.मी. तर १२ जुलैअखेर फक्त ९.५३ मि.मी. पाऊस पडला आहे. म्हणजे फक्त ५१.०३ मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे पीक परिस्थितीवर विपरित परिणाम झाले आहेत. दुष्काळाची प्रथम कळ निर्माण झाली आहे.
काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही उपयोग झालेला नाही. काही ठिकाणी बियाण्याचे कोंब येऊन पाणीच नसल्याने कोमेजले आहे. पीक हातचे गेले आहे. उडीद, मूग या पिकांचा उत्पन्न येण्याचा कालावधी संपल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीऐवजी शेती रिकामी ठेवली आहे. अनेक ठिकाणी शेतीला अद्यापही तडे पडलेले दिसत आहेत. ७२ तासात बियाणे न उगवल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळतो. मात्र अजून बँकांनी विमा हप्ता कंपन्यांना न भरल्याने तेही लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
बियाणे, खते मजुरीचा पैसा वाया गेला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज देण्यास अजूनही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त होऊन त्यांच्यापुढे आत्महत्याशिवाय पर्याय नाही.
तरी महसूलमंत्र्यांनी दुष्काळाच्या पहिल्या टप्प्यातच काहीतरी उपाययोजना करून संबंधित विभागाना योग्य त्या कारवाईच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे.