पालकमंत्री व आमदारांमध्ये आगपेटीबाज आगलावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:31+5:302021-07-14T04:19:31+5:30
पारोळा : पारोळा येथे सोमवारी झालेल्या शिवसेना शिवसंपर्क अभियानात पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांच्यात जोरदार जुगलबंदी ...

पालकमंत्री व आमदारांमध्ये आगपेटीबाज आगलावे !
पारोळा : पारोळा येथे सोमवारी झालेल्या शिवसेना शिवसंपर्क अभियानात पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांच्यात जोरदार जुगलबंदी झाली. समर्थकांनी चिमणराव पाटील आगे बढोच्या घोषणा देऊन या जुगलबंदीला तोंड फोडले. आमच्यात मनभेद असल्याचे पालकमंत्र्यांनी कबूल करीत आमच्यात आगलावे असल्याचे सांगितले. तर आमदार पाटील यांनी राजकारणातील उर्वरित दिवस सन्मानाने पूर्ण करणार असल्याचे सांगत जणू निवृत्तीचे संकेत दिले.
पारोळा येथील बाजार समितीच्या हरिनाथ मंगल कार्यालयात शिवसंपर्क अभियानात पारोळा, भडगाव, एरंडोल, चाळीसगाव पाचोरा तालुक्याचा
मेळावा झाला. उपस्थित मान्यवरांनी एकमेकांचे जाहीरपणे शाब्दिक चिमटे काढत हास्याचे फवारे उडविले. अध्यक्षस्थानी संपर्क प्रमुख संजय सावंत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील,आमदार किशोर पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे , महिला आघाडी
प्रमुख महानंदा पाटील , बाजार समिती सभापती अमोल पाटील, उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील , माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, रोहिदास पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष अरुण पाटील,संभाजी भोसले, गणेश परदेशी, शहर महानगर प्रमुख शरद तायडे, एरंडोल तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, पारोळा शहर प्रमुख अशोक मराठे उपस्थित होते.
पदे वाटून द्या...
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, चिमणराव पाटील यांच्याशी थोडे मनभेद आहेत. पण त्यांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी
देताना कधी हात आखडता घेत नाही. त्यांना दोन दिवसात ३ कोटींचा निधी पुलासाठी दिला. त्यांच्या मतदारसंघात जुने शिवसैनिक आहेत. त्यांच्याकडील
मरण धरण वा लग्न कार्याला आग्रहाखातर आम्हाला यावे लागते. आबा..आपण, आमच्या सर्वांमध्ये वयस्कर आहेत. आपण सहकार, कृषी, फेडरेशन, दूध संघ सर्व ठिकाणी आहेत. ही पदे सर्वांना वाटून द्या...म्हणजे कार्यकर्तेही खुश होतील. समज गैरसमज काढा. आपल्याच पैकी काहीजण
आगपेटी घेऊन फिरत आहे. ते आग लावण्याचे काम करीत आहेत. या आग लावणाऱ्यांपासून सांभाळले पाहिजे.
उर्वरित दिवस सन्मानाने पूर्ण करणार
आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे संघटना वाढीसाठी मर्यादा येतात. जिल्ह्यात तीन-चार तालुके सोडले तर इतर
ठिकाणी पक्षाचा प्रभाव दिसत नाही. जिल्हा परिषदेत आपले २० च्या वर सदस्य जात नाहीत. आपण राजकारणातील उर्वरित दिवस सन्मानाने पूर्ण करणार आहोत. यात माझा बळी गेला तरी चालेल, पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. आमदार किशोर पाटील म्हणाले की, आगामी काळात पक्ष वाढीसाठी नव्या
चेहऱ्यांना संधी द्या. जिल्ह्यात कोणतीही दुफळी नाही. थोडेफार समज-गैरसमज झाले असतील तर ते दूर होतील. पण यात पत्रकारांनी त्यात तेल टाकून आग
लावू नये, असे सांगत ते पत्रकारांवर घसरले. तर शिवसेनेत कुठलेही मतभेद नसल्याचे संजय सावंत यांनी सांगितले.
घोषणाबाजांना सुनावले
समर्थकांनी आमदार चिमणराव पाटील आगे बढोच्या घोषणा दिल्या. त्यामुळे गुलाबराव वाघ यांनी घोषणाबाज तरुणांना ही पक्षाची शिस्त नसल्याचे सांगत चांगलेच सुनावले.
आता मुलांना पुढे करा..
राजकारणातील उर्वरित दिवस सन्मानाने पूर्ण करणार असल्याचे चिमणराव पाटील यांनी सांगितले. त्यावर गुलाबराव पाटील यांनीही आमचे वय आता
५६ असल्याचे सांगत, आम्हीही यातून मोकळे होऊ. यावर आमदार किशोर पाटील यांना दोघांना मध्येच थांबबत तुम्ही दोन्ही जण आता बाजूला व्हा व
मुलांना पुढे करा, असा चिमटा काढला...यावर गुलाबराव पाटील म्हणाले की आमचे मुले राजकारणात येणार नाही, असे सांगताच एकच हशा पिकला.
फोटो ओळी
पारोळा येथील मेळाव्यात बोलताना गुलाबराव पाटील. सोबत व्यासपीठावर महानंदा पाटील, वासुदेव पाटील, गुलाबराव वाघ, संजय सावंत, चिमणराव
पाटील, किशोर पाटील, डॉ. हर्षल माने आदी.