देवदर्शन करून परतणाऱ्या पितापुत्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:14 PM2021-03-13T16:14:28+5:302021-03-13T16:16:05+5:30

मोटरसायकलवर घराकडे परतणाऱ्या पिता पुत्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.

Father and son returning from Devdarshan killed in an unidentified vehicle collision | देवदर्शन करून परतणाऱ्या पितापुत्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

देवदर्शन करून परतणाऱ्या पितापुत्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Next
ठळक मुद्देफैजपुर: पिंपरूळ फाट्यावरील घटना; गतीरोधकाच्या अभावामुळे झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

फैजपूर: देवदर्शन करून मोटरसायकलवर घराकडे परतणाऱ्या पिता पुत्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना येथून जवळच असलेल्या पिंपरूळ फाट्यावरती शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली.

अपघातात ठार झालेल्या पिता पुत्राचे नावे गोपाळ गेंदराज पाटील (६६) ,खेमचंद गोपाळ पाटील (३३, गुरुदत्त कॉलनी) अशी आहेत. दरम्यान पिंपरूळ फाट्यावरती एकही गतिरोधक नसल्याने भरधाव वाहनांमुळेच अपघात होत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक टाकण्याची मागणी वाढली आहे.

खेमचंद पाटील हा वडील गोपाळ पाटील यांना घेऊन दुचाकीने (एमएच १९ डीबी ५४४२)ने चिखली खु॥ ता. यावल येथील शेतातून देवदर्शन करून फैजपूरकडे परतत असताना पिंपरुड फाट्यावरील सोनम एंटरप्राइजेस जवळ आमोद्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पाटील पितापुत्राच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गोपाळ पाटील हे जागीच ठार झाले तर खेमचंद पाटील याला जखमी अवस्थेत फैजपूर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असलेल्या पाटील याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे व त्यांचे सहकारी अपघात ग्रस्त ठिकाणी भेट देऊन चौकशी केली. या अपघाताप्रकरणी पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मयत झालेल्या पाटील पिता पुत्रांचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले तर सायंकाळी दोघांवरती एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकानी एकच आक्रोश केला होता.

गतिरोधकाच्या अभावामुळे होत आहेत अपघात

नुकताच आमोदा ते सावदा या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. चौपदरीकरण करीत असताना पिंपरुड फाट्याजवळ असलेल्या चौफुलीवरती एकाही दिशेला गतीरोधक टाकण्यात आला नाही. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे नेहमीच या ठिकाणी अपघात होत असतात. या रस्त्यावरती गतिरोधक टाकावे याकरिता पिंपरुड तसेच विरोदा ग्रामपंचायतीने संबधीत विभागाला पत्र दिले आहे. तसेच महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज यांनीही संबधीतांना तसेच लोकप्रतिनिधीना अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावर गतिरोधक टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजच्या अपघातासारखी दुर्दैवी घटना घडल्याची खंत व्यक्त केली.

Web Title: Father and son returning from Devdarshan killed in an unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.