मुलाच्या बस्त्यासाठी जाणारे, वडील व काकू अपघातात ठार; भरधाव रिक्षा तीन वेळा उलटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 22:34 IST2022-03-13T22:34:06+5:302022-03-13T22:34:30+5:30
मुलाच्या लग्नाच्या बस्त्यासाठी जाणारे नवरदेवाचे वडील आणि काकू रिक्षा अपघातात ठार झाले तर तीन जण जखमी झाले. ही घटना भोरटेक ता. यावलनजीक रविवारी दुपारी १२.३० वाजता घडली.

मुलाच्या बस्त्यासाठी जाणारे, वडील व काकू अपघातात ठार; भरधाव रिक्षा तीन वेळा उलटली
यावल जि. जळगाव : मुलाच्या लग्नाच्या बस्त्यासाठी जाणारे नवरदेवाचे वडील आणि काकू रिक्षा अपघातात ठार झाले तर तीन जण जखमी झाले. ही घटना भोरटेक ता. यावलनजीक रविवारी दुपारी १२.३० वाजता घडली.
दिलीप दिनकर तायडे (५०) आणि ज्योत्स्ना गोकुळ तायडे (४५, रा. आंदलवाडी ता. रावेर) अशी मृत वडिल आणि काकूचे नावे आहेत. आंदलवाडी ता. रावेर येथील शुभम दिलीप तायडे याचा बस्ता रविवारी भुसावळ येथे होणार होता. त्यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक रिक्षाने भुसावळकडे निघाले होते.
वाटेत भोरटेक ता.यावलजवळ रस्त्यावरील खड्डे चुकवताना चालकाचा ताबा सुटला व अचानक रिक्षा उलटली. रिक्षा भरधाव असल्याने रिक्षा तीन वेळा उलटली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात नवरदेवचे वडील आणि काकू जागीच ठार झाले तर ज्योती बुधाकर तायडे, ललिता संतोष तायडे आणि बुधाकर भास्कर तायडे हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना भुसावळ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.