जळगाव जिल्ह्यात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतक-याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 22:58 IST2018-03-02T22:58:05+5:302018-03-02T22:58:05+5:30
शेतात गेलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवत ठार केले. ही घटना वडोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत डोलारखेडा फॉरेस्ट कॅम्पार्टमेंट ५१७ लगतच्या शिवारात रात्री ८ वाजता उघडकीस आली.

जळगाव जिल्ह्यात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतक-याचा मृत्यू
जळगाव : शेतात गेलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवत ठार केले. ही घटना वडोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत डोलारखेडा फॉरेस्ट कॅम्पार्टमेंट ५१७ लगतच्या शिवारात रात्री ८ वाजता उघडकीस आली. लक्ष्मण गणपत जाधव (वय ६५ रा.डोलारखेडा ता. मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे. वाघाचे अधिवास असलेल्या या जंगलात वाघाच्या हल्ल्यातील हा पहिला बळी आहे.
शेतकरी लक्ष्मण जाधव हे नेहमी प्रमाणे सकाळी ११ वाजता शेतात गेले होते. अंधार पडल्यावर ही ते परत आले नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय व ग्रामस्थ शेताकडे गेले असता रात्री ८ च्या सुमारास त्यांच्या शेतापासून १०० फूट अंतरावर पूर्णा नदीकडे पट्टेदार वाघ काही तरी खात असल्याचे दुरून दिसून आला. गावातून येथे जमाव जमवला गेला व आरोड्या ठोकत पट्टेदार वाघास ग्रामस्थांनी हुसकावून लावले. जवळ पोहोचताच मयत लक्ष्मण जाधव यांचे निम्मे शरीर वाघाने खाल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच वनधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या वन परिक्षेत्रात ४ मोठे पट्टेदार वाघ तर 3 छावे असे एकूण ७ पट्टेदार वाघ आहेत. तसेच अधिकृत नोंद व छायाचित्रे देखील वन विभागाने टिपले आहेत. याचबरोबर, अलीकडे एक वयोवृद्ध पट्टेदार वाघ सातत्याने नजरेस पडत आहे. आजचा हा नरभक्षक पट्टेदार वाघ नेमका कोणता याचा शोध घेण्याबाबतचे आव्हान वनविभागा समोर आहे, तर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.