लेकरासाठी भीक मागून भरली वकिलाची फी, नियतीने अंध माय-लेकींचा गुदमरला श्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:25 AM2023-05-29T10:25:56+5:302023-05-29T10:28:07+5:30

अंध माय-लेकी उन्हातान्हात भीक मागून कुटुंबाच्या दोन वेळेची भ्रांत निस्तरतात आणि मिळालेल्या पैशांतून वकिलाची फीही भरतात.

eye blind family taking money begging to give lawyers fee jalgaon child arrested theft | लेकरासाठी भीक मागून भरली वकिलाची फी, नियतीने अंध माय-लेकींचा गुदमरला श्वास 

लेकरासाठी भीक मागून भरली वकिलाची फी, नियतीने अंध माय-लेकींचा गुदमरला श्वास 

googlenewsNext

कुंदन पाटील
जळगाव : चोरीच्या गुन्ह्यात जळगाव कारागृहात एकुलते एक लेकरू बंद आहे. त्याच्या सुटकेसाठी शिरपूरचे एक आदिवासी कुटुंब येथे येऊन धडकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बसस्थानकावर फाटका संसार मांडलेला आहे. अंध माय-लेकी उन्हातान्हात भीक मागून कुटुंबाच्या दोन वेळेची भ्रांत निस्तरतात आणि मिळालेल्या पैशांतून वकिलाची फीही भरतात.. असा दिनक्रमच  या परिवाराच्या नशिबी आला आहे.

खलीबाई आणि बाबूलाल पावरा (रा. सांगवी, शिरपूर) या दाम्पत्याच्या घरी वर्षानुवर्षे दु:खाचा जणू मुक्कामच आहे. एकापाठोपाठ सहा लेकरे दगावली. सातवा संदीप जगला. पाठोपाठ बसंती आली; पण ती जन्मत:च अंध. कालांतराने आई खलिबाईचीही दृष्टी गेली. संदीप आता हाताशी आला होता. बाबूलाल व तो मजुरी करत होते. परंतु एका बॅटरी चोरीत संदीपला अटक झाली. त्याची रवानगी जळगाव कारागृहात झाली. तेव्हा पावरा कुटुंबाने शनिवारी जळगाव गाठले.  

प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन जमविले पैसे...
बाबूलाल कारागृहाच्या दारावर गेला. तेथील पोलिसाला त्याची दया आल्याने त्यानेच एका वकिलाला फोन लावला. वकिलाने मोफत काम करण्याची तयारी दर्शविली; परंतु दस्तावेजासाठी चारशे रुपये लागतील असे सांगितले. 
तेव्हा अंध माय-लेकीने भीक मागून पैसे जमवले. प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन पैसे वकिलाकडे सुपुर्द केले. आता पावरा दाम्पत्य सोमवारची वाट बघते आहे. त्यांचा संदीप कारागृहाबाहेर येणार म्हणून.

Web Title: eye blind family taking money begging to give lawyers fee jalgaon child arrested theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव