दुर्मीळ अंडी भक्षक सापाचे अस्तित्व आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:51+5:302021-08-13T04:20:51+5:30
मुक्ताईनगरात आढळला अंडीभक्षक साप मुक्ताईनगर, जि. जळगाव : जगातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मीळ अशा भारतीय अंडीभक्षक सापाचे ...

दुर्मीळ अंडी भक्षक सापाचे अस्तित्व आढळले
मुक्ताईनगरात आढळला
अंडीभक्षक साप
मुक्ताईनगर, जि. जळगाव : जगातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मीळ अशा भारतीय अंडीभक्षक सापाचे अस्तित्व तालुक्यातील कुऱ्हा येथे आढळून आले आहे. सर्पमित्र संजय इंगळे यांच्या समयसूचकतेमुळे त्याला जीवदान मिळाले.
येथील शिवाजी हायस्कूलजवळ साप असल्याची माहिती सर्पमित्र संजय इंगळे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांना हा दुर्मीळ साप असल्याचे जाणवले. त्यांनी या सापाला पकडून वनविभागाच्या कुऱ्हा येथील कार्यालयात नेले. त्या ठिकाणी त्यांनी आणखी माहिती घेतली असता हा साप अंडीभक्षक साप असल्याची त्यांची खात्री झाली. वनविभागाकडे याची नोंद करून त्यांनी सापाला सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.
चौकट
अंडीभक्षक सापाच्या जगात १३ प्रजाती आहेत. सापाची ही जात नष्ट झाल्याचे मानले जात होते. मात्र, सुमारे शंभर वर्षांनंतर २००३ मध्ये त्याचा पुन्हा शोध लागला. रशियन जर्नल ऑफ हरपेटोलॉजी या शोध पत्रिकेत याबाबत शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. मुनिया, चिमणी, पारवा, होला या मोजक्या पक्ष्यांची अंडी खाऊनच जगणारा हा साप महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात व तेलंगणामध्ये आढळतो.
चौकट
वाघाइतकेच महत्त्व व संरक्षण
वन्यजीव संवर्धन अधिनियम १९७२ नुसार वाघ हा अनुसूची एक मधील प्राणी आहे त्याप्रमाणेच अंडीभक्षक सापसुद्धा अनुसूची एक मधील संरक्षित प्राणी असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली.
120821\img-20210810-wa0032.jpg
कुऱ्हा येथे वनपाल पाचपांडे यांना अंडी भक्षक सापाची माहिती देताना सर्पमित्र संजय इंगळे