मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:32+5:302021-08-13T04:20:32+5:30
मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत! मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा; चार ते पाच टक्क्यांनी वाढणार कटऑफ स्टार - १०४० सागर दुबे लोकमत ...

मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !
मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत!
मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा; चार ते पाच टक्क्यांनी वाढणार कटऑफ
स्टार - १०४०
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अकरावी प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात सामाईक प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्त्वाचा निकाल नुकताच दिला. त्यामुळे आता दहावीच्या निकालाच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, यंदा मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे आता प्रवेशासंदर्भात महाविद्यालयांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.
दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेशासाठी २१ ऑगस्टला सीईटी परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नुकताच दिला आहे. एवढंच नव्हे, तर हायकोर्टाने पुढील सहा आठवड्यांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, अशाही सूचना केल्या आहेत. दरम्यान, या यासंदर्भात राज्य सरकारने ११ ऑगस्टला अधिकृत पत्र काढले आहे. आता दहावीच्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया कधीपासून राबवावी, यासाठी वेळापत्रकाची प्रतीक्षा महाविद्यालयांना लागू आहे.
००००००००००
१) दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ५८,२४९
अकरावीची प्रवेश क्षमता - ४९,०८०
००००००००००
२) कोणत्या शाखेत किती जागा
कला - २४,३२०
वाणिज्य - ५,२६०
विज्ञान - १७,२००
००००००००००
महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार
मनासारखे महाविद्यालय आणि शाखा मिळावी यासाठी विद्यार्थ्यांची यंदा स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये चार ते पाच टक्क्यांनी यावेळी वाढ होणार आहे. दहावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेशाची मेरिट लिस्ट लागल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना त्या जागांवर प्रवेश दिला जाणार आहे.
आता प्रतीक्षा निर्देशांची
कटऑफ हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. त्यानंतर महाविद्यालयातील जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असतो.
- प्रा. डॉ. एल. पी. देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय
०००००००
शिक्षण उपसंचालकांच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. दहावीच्या गुणांवर मेरिट लिस्ट जाहीर केल्यानंतर प्रवेश देण्यात येईल. सध्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय
००००००
दहावीला चांगले गुण मिळाले आहे. विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा आहे. हवे ते महाविद्यालय मिळायला हवे. आता लवकरात लवकर प्रवेश प्रक्रियेची सुरुवात व्हावी.
- नक्ष पाटील, विद्यार्थी
००००००००
सीईटी परीक्षेचा अभ्यास केला होता. मात्र, ती परीक्षा रद्द झाली आहे. ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे, तेथील माहिती मिळविली आहे. प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होताच, त्याठिकाणी प्रवेश मिळावा यासाठी नोंदणी करणार आहे. मात्र, ही प्रक्रिया लांबू नये.
- ऋषिकेश अहिरे, विद्यार्थी