दीड वर्षानंतरही दूध विक्रीची तूट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST2021-09-11T04:18:41+5:302021-09-11T04:18:41+5:30
जळगाव : कोरोना संसर्गापासून दूध विक्रीत आलेली घट अजूनही भरुन निघाली नसून जिल्हा दूध संघाकडून जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्या ...

दीड वर्षानंतरही दूध विक्रीची तूट कायम
जळगाव : कोरोना संसर्गापासून दूध विक्रीत आलेली घट अजूनही भरुन निघाली नसून जिल्हा दूध संघाकडून जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्या विक्रीचे प्रमाण अजूनही पूर्ववत आलेले नाही. २५ हजार लीटर दूध कमी विक्री होत असून निर्बंध हटून हॉटेल सुरू झाल्या असल्यातरी पूर्वीप्रमाणे मागणी वाढलेली नाही.
जिल्हा दूध संघातून जळगाव जिल्ह्यासह मराठवाडा, मुंबई येथे दुधाचा पुरवठा केला जातो. कोरोना पूर्वी दररोज दोन लाख लीटरचा पुरवठा जिल्हा दूध संघातून होत असे. मात्र कोरोनाचा संसर्ग पसरला त्यामुळे मालवाहतुकीवर परिणाम झाल्याने दुधाच्याही पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यात गेल्या वर्षी लॉकडाऊनचा कालावधी अधिक दिवस राहिल्याने मोठ्या हॉटेलसह लहान-लहान चहाच्या हॉटेलही बंद होत्या. त्यामुळे दुधाची मागणी कमी होऊन ती दोन लाख लिटरवरून थेट एक लाख १० हजार लिटरवर आली. त्यानंतर स्थिती सुधारत असताना दुधाची मागणी वाढत गेली. मात्र या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा निर्बंध लागू झाल्याने दुधाची मागणी कमी झाली.
१५ ते २० टक्के तूट कायम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध सध्या बऱ्याच अंशी शिथिल झाले आहेत. यामुळे हॉटेल व सर्वच व्यवसाय रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहत आहे. असे असले तरी जिल्हा दूध संघातून होणारा दुधाचा पुरवठा कोरोना पूर्वीएवढा अजूनही होऊ शकलेला नाही. सध्या संघातून एक लाख ७५ हजार लिटरचा दररोज पुरवठा सुरू आहे. दीड वर्षापूर्वीच्या तुलनेत अजूनही १५ ते २० टक्के तूट कायम आहे.
सणासुदीमुळे पुरवठा वाढण्याची शक्यता
सध्या दुधाच्या मागणीत घट असली तरी आगामी सणासुदीच्या काळात दुधाला मागणी वाढणार असल्याचा अंदाज आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा, नवरात्रोत्सव या काळात दुधाला मागणी वाढून जिल्हा दूध संघाचा पुरवठा पूर्ववत होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनापूर्वी जिल्हा दूध संघाकडून जेवढा दुधाचा पुरवठा होत होता, त्यात अजूनही १५ ते २० टक्क्यांची तूट आहे. आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढून दूध संघाचा पुरवठा लवकरच पूर्ववत होऊ शकेल.
- मनोज लिमये, कार्यकारी संचालक, जिल्हा दूध संघ