अनलॉकनंतरही ५० टक्केच मुक्कामी बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:43+5:302021-07-31T04:17:43+5:30
सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिन्यात सर्वत्र अनलॉक केल्यानंतर शासनाने टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर बस सेवा सुरू ...

अनलॉकनंतरही ५० टक्केच मुक्कामी बससेवा
सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या महिन्यात सर्वत्र अनलॉक केल्यानंतर शासनाने टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर बस सेवा सुरू केली आहे. मात्र, ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या बसेस अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू केलेल्या नसून, सध्या ५० टक्केच ही सेवा सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सकाळी लवकर बाहेरगावी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना व विद्यार्थांना सकाळी लवकर शहरात येण्यासाठी महामंडळातर्फे अनेक गावांना रात्री मुक्कामाला बसेस पाठविल्या जातात. रात्रभर मुक्कामी राहून पहाटेच या बसेस शहरात दाखल होतात. सध्या वाहतुकीची अनेक पर्यायी साधने उपलब्ध असली तरी, आजही ग्रामीण भागातील नागरिकांचा या मुक्कामी बसेसला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मात्र, कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून महामंडळातर्फे अनेकदा मुक्कामाला जाणाऱ्या बसेसची सेवा अधूनमधून स्थगित करण्यात आली. परंतु, आता गेल्या महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सर्वत्र सेवा सुरू झाली असली, तरी ग्रामीण भागातील मुक्कामी जाणाऱ्या बसेसची सेवा १०० टक्के सुरू झालेली नाही. जिल्ह्यातील सध्या ५० टक्केच गावांमध्ये महामंडळाची त्या-त्या आगारातून मुक्कामी बसेसची सेवा सुरू आहे. त्यामुळे उर्वरित गावांनाही सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांमधून केली जात आहे.
इन्फो
कोरोनापूर्वी मुक्कामी जाणाऱ्या बसेस कोरोनानंतर जाणाऱ्या बसेस
आगार बसेस
जळगाव : १५ १०
जामनेर : १३ १०
पाचोरा : १४ १२
चाळीसगाव : ११ ७
जामनेर : २१ १५
चोपडा : १३ ११
यावल : ४ ४
रावेर : ९ ८
मुक्ताईनगर : १३ ९
भुसावळ : ३ ३
एरंडोल : १५ १०
इन्फो :
५० टक्के बसेस आगारातच
- अनलॉकनंतर महामंडळाची टप्प्याटप्प्याने बहुतांश गावांना सेवा सुरू झाली असली, तरी अद्याप प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सध्या निम्म्याच फेऱ्या सुरू आहेत. ५० टक्के बसेस आगारातच थांबून आहेत.
- कोरोनापूर्वी महामंडळातर्फे जिल्ह्यात दोन ते अडीच हजारांच्या घरात फेऱ्या होत होत्या. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली असल्यामुळे सध्या दीड हजारांच्या घरात फेऱ्या होत आहेत.
- सध्या महामंडळाच्या एक हजारांच्या घरात फेऱ्या बंद आहेत.
इन्फो :
रुग्ण घटले, एसटी कधी धावणार
कोरोनापूर्वी आमच्या गावाला बस नियमित मुक्कामी यायची. मात्र, कोरोनामुळे ही बस बंद आहे. त्यामुळे सकाळी जळगावला जाण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामंडळाची मुक्कामी बस बंद असल्यामुळे खासगी प्रवासी वाहनांना जादा पैसे मोजून शहरात जावे लागत आहे. तरी आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महामंडळाने बस तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
देवेंद्र बडगुजर, निंभोरा.
कोरोनाची दुसरी लाट गेल्यानंतरही आमच्या गावाला महामंडळाने अद्याप मुक्कामी बस सुरू केलेली नाही. कोरोनापूर्वी ही बस नियमित गावात यायची. परंतु, आता ही बस बंद असल्यामुळे सकाळी जळगावला जाणाऱ्या नागरिकांची खूपच गैरसोय होत आहे. तरी महामंडळाने नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेता, मुक्कामी बस तातडीने सुरू करावी, ही मागणी महामंडळाकडे लवकरच करणार आहोत.
विलास पाटील, खेडी-कढोली.
इन्फो :
सध्या महामंडळातर्फे ५० ते ६० टक्के मुक्कामी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने इतर गावांनाही मुक्कामी बसेस सुरू करणार आहोत. प्रवाशांचा जसा-जसा प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार जादा बसेस सोडण्यात येत आहेत.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ.