दोन वर्षांनंतरही शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:16+5:302021-08-01T04:16:16+5:30
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असताना, दोन ...

दोन वर्षांनंतरही शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण नाही
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असताना, दोन वर्षांपासून जळगाव ते पाचोरा दरम्यानही हाती घेण्यात आले. हाती घेण्यात आलेले तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम मात्र अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे दोन वर्षे उलटूनही शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पाही पूर्ण झाला नसल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनातर्फे सध्या या ठिकाणी फक्त रूळ टाकण्यात आले असून, विद्युतीकरणासह सिग्नल यंत्रणेचे काम बाकी आहे. दोन वर्षांच्या मुदतीत हा मार्ग पूर्ण न झाल्यामुळे, हे काम आता कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या चार वर्षांपासून भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या दोन वर्षांत भुसावळ ते भादली दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला तर त्यानंतरच्या दोन वर्षांत भादली ते जळगाव दरम्यान दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला. एकूण २४ किलोमीटरचा तिसऱ्या रेल्वे मार्गाचा टप्पा पूर्ण झाला असून, येत्या १५ ऑगस्टपासून या मार्गावरून रेल्वेही धावणार आहे. मात्र, ज्या वेगाने आणि दिलेल्या वेळात रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम केले. त्या वेगाने जळगाव ते शिरसोली दरम्यान तिसऱ्या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे अधूनमधून अनेकदा हे काम रखडले असताना, दुसरीकडे कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर, रेल्वेतर्फे वेळेवर काम सुरू न करण्यात आल्यामुळे निश्चित वेळेत शिरसोलीपर्यंतचा टप्पा पूर्ण झालेला नाही.
इन्फो :
विद्युतीकरणासह सिग्नल यंत्रणेचेही काम बाकी :
रेल्वे प्रशासनातर्फे खासगी मक्तेदाराच्या माध्यमातून हे काम करण्यात येत असून, जळगावातील पिंप्राळा रेल्वे गेटपासून तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडथळा वगळता शिरसोलीपर्यंत जमिनीचे सपाटीकरण करून लोखंडी रूळही टाकण्यात आले आहेत. परंतु, विद्युतीकरण व सिग्नल यंत्रणा उभारण्याचे काम अद्यापही बाकी आहे. ही यंत्रणा उभारल्यावरच या मार्गावरून रेल्वे धावणार आहे.
इन्फो :
शिरसोलीच्या पुढे सपाटीकरणाचे काम सुरू :
रेल्वे प्रशासनातर्फे जळगावातून सुरू केलेला शिरसोलीपर्यंतचा तिसऱ्या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा वेेळेत पूर्ण न झाल्यामुळे, पुढचा टप्पा वेळेत पूर्ण करण्यासाठी शिरसोलीपासून पुढे तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी सपाटीकरण, भुयारी बोगदे व पूल उभारण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे रात्रीदेखील हे काम सुरू आहे.
इन्फो :
कोरोनामुळे मधल्या काळात अनेकदा तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम रखडले होते. त्यामुळे शिरसोलीपर्यंतच्या टप्प्याला विलंब होत आहे. सध्या या ठिकाणी कामाला सुरुवात झाली असून, लवकरच हे पूर्ण करण्यात येणार आहे.
- पंकज डावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग