दीड महिन्यानंतरही आकाशवाणी केंद्र सुरळीत होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:07+5:302021-07-27T04:18:07+5:30
‘नमस्कार श्रोते हो’.. अशा मंत्रमुग्ध आवाजाने अनेक नागरिकांची दिवसाची सुरुवात जळगाव आकाशवाणी केंद्रावरील सकाळच्या ‘विचारपुष्प’ कार्यक्रमाने होते. अलीकडे ...

दीड महिन्यानंतरही आकाशवाणी केंद्र सुरळीत होईना
‘नमस्कार श्रोते हो’.. अशा मंत्रमुग्ध आवाजाने अनेक नागरिकांची दिवसाची सुरुवात जळगाव आकाशवाणी केंद्रावरील सकाळच्या ‘विचारपुष्प’ कार्यक्रमाने होते. अलीकडे मनोरंजनाची विविध माध्यमे आली असली तरी, अनेक नागरिकांच्या घरात रेडिओवरून आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम नित्यनेमाने ऐकले जातात. मात्र, गेल्या महिन्यात आकाशवाणीच्या प्रक्षेपण केंद्राला लागलेल्या आगीमुळे, ४० वर्षांत पहिल्यादांच या केंद्राचे प्रक्षेपण बंद पडले होते. आगीच्या घटनेनंतर टप्प्याने या केंद्राचे प्रक्षेपण पूर्ववत होत असले तरी दिवसभरात अधूनमधून प्रक्षेपणात खंड पडत आहे.
सोमवारी दुपारी दीडच्या बातम्या सुरू झाल्यावर तीन वेळा प्रक्षेपणात खंड पडला. त्यानंतर चित्रपट संगीताचा कार्यक्रम सुरू झाला आणि तोही कार्यक्रम खंडित होऊन मध्येच मराठी बातम्या सुरू झाल्या. त्यानंतर पुन्हा कोरोनाबद्दल हिंदीतून माहिती देण्यात येत होती आणि मध्येच पुन्हा खंड पडून चित्रपटांचे गाणे सुरू झाले. या प्रकारामुळे नागरिकांना नेमका कुठला कार्यक्रम सुरू आहे, हे कळत नसून श्रोत्यांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे आकाशवाणी प्रशासनाने तात्काळ प्रक्षेपण केंद्र सुरळीत करण्याची मागणी श्रोत्यांमधून करण्यात येत आहे.
इन्फो :
शिरसोलीतील आगीच्या घटनेनंतर आता आकाशवाणीचे प्रक्षेपण केंद्र पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहे. तांत्रिक कारणामुळे प्रक्षेपण खंडित होण्याची शक्यता असते. मात्र, संबंधित नागिरकांच्या रेडिओमध्येही काही तांत्रिक बिघाड असल्यास ही समस्या उद्भवू शकते.
सुधीर ओगदे, कार्यक्रमाधिकारी, जळगाव आकाशवाणी केंद्र