मुक्ताईनगरसह संपुर्ण रावेर मतदारसंघ भाजपमय करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:39+5:302021-02-05T05:52:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - येणाऱ्या काळात पक्षाबाबत मी काय भूमिका घेणार याबद्दल अनेक कार्यकर्त्यांचा मनात शंका आहेत. ...

The entire Raver constituency including Muktainagar will be BJP friendly | मुक्ताईनगरसह संपुर्ण रावेर मतदारसंघ भाजपमय करणार

मुक्ताईनगरसह संपुर्ण रावेर मतदारसंघ भाजपमय करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - येणाऱ्या काळात पक्षाबाबत मी काय भूमिका घेणार याबद्दल अनेक कार्यकर्त्यांचा मनात शंका आहेत. मात्र,कोणत्याही परिस्थितीत भाजप पक्षाला सोडणार नसून भविष्यातही भाजपातच राहणार असल्याचे आश्वासन खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी ब्राम्हण सभेत झालेल्या भाजपच्या जिल्हा ग्रामीणच्या मेळाव्यात दिले आहे. तसेच येणाऱ्या नगरपालिका, जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मुक्ताईनगरसह संपुर्ण रावेर मतदारसंघ भाजपमय करून दाखवू असा विश्वास देखील खडसे यांनी व्यक्त केला आहे.

खासदार रक्षा खडसे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रावेर मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. भाजपकडून पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान बुथ संपर्क अभियानाचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी सोमवारी ब्राम्हण सभेत भाजप जिल्हा ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भाजपचे विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, आमदार संजय सावकारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खडसे यांचे खडसेंनाच आव्हान

रक्षा खडसे यांनी सांगितले की, आगामी काळात जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुका असून, या निवडणुकामध्ये रावेर मतदार संघात भाजपचाच डंका वाजणार असून, यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन खडसे यांनी केले. दरम्यान, भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांना आपले राजकीय अस्तित्व सिध्द करण्यासाठी आगामी जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठे यश मिळवून देण्याची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्यावर राहणार आहे. तर खासदार रक्षा खडसे यांनाही आपले वर्चस्व सिध्द करण्याठी या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळवून द्यावे लागणार आहे. त्यातच रक्षा खडसे यांनी आगामी निवडणुकांसाठी हुंकार भरल्याने एकप्रकारे एकनाथ खडसे यांनाच आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे.

केंद्राच्या योजनांचे श्रेय पालकमंत्री घेताहेत - उन्मेष पाटील

केंद्र शासनाकडून राबविण्यात येणार्या जलजीवन मिशन सारख्या योजनांचे श्रेय जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे घेत असल्याचा आरोप खासदार उन्मेष पाटील यांनी या मेळाव्यात केला. तसेच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांबाबत देखील खासदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन केले.

बड्या पदाधिकाऱ्यांवर राहणार नजर - सुरेश भोळे

अनेक पदाधिकारी पक्षाच्या आंदोलनांकडे पाठ फिरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यकर्ते आंदोलनात मनापासून सहभागी होत असताना गुन्हे दाखल होतील या भितीने पदाधिकारी आंदोलनात येत नसून, आता पुढे या पदाधिकाऱ्यांवर पक्षाची नजर असणार असून, पदाधिकाऱ्यांनी पक्षाची भूमिका जहालपणे मांडण्याची गरज असल्याचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी सांगितले. या मेळाव्यात तालुकाप्रमुखांकडून ग्रामपंचायत निवडणुकांचा देखील आढावा घेण्यात आला.

Web Title: The entire Raver constituency including Muktainagar will be BJP friendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.