ना दिखावा, ना बडेजाव; आठ जोडपी अवघ्या एक रुपयात अडकली विवाह बंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 23:19 IST2019-04-13T23:19:10+5:302019-04-13T23:19:15+5:30
मराठा उद्योजक संस्थेचा उपक्रम

ना दिखावा, ना बडेजाव; आठ जोडपी अवघ्या एक रुपयात अडकली विवाह बंधनात
जळगाव: लग्न पहावे करुन असे म्हणतात. अलीकडे तर विवाह सोहळ्यांना इव्हेन्टचा लूकही दिला जातो. प्रतिष्ठेचा बडेजाव करताना लाखो रुपये खर्च केले जातात. या सर्व बडेजावाला फाटा देत अवघ्या एक रूपयात आठ जोडप्यांचे शुभमंगल करण्याची किमया मराठा उद्योजक विकास मंडळ व अ.भा. क्षत्रिय मराठा महामंडळाने केली आहे. या सोहळ्याने अक्षतांना जणू सामाजिक बांधिलकीचे कोंदण लाभले होते.
आदर्शाचे सनईस्वर आळवत हा सामूहिक विवाह सोहळा शनिवारी दुपारी सागर पार्क मैदानावर हर्षोल्हासात पार पडला. यावेळी नवदाम्पत्यांना समाज बांधवांकडून संसारोपयोगी भेट वस्तू देण्यात आल्या. या सोहळ्यात माधुरी कदम-सागर शेलार, पूनम वायकर-वसंत आभाळे, मानसी माळतकर-राहुल इंगळे, आरती लंके-नीलेश गुंजाळ, निकिता शेट्ये-भागवत गायकवाड, योगिता शिंदे-राजेंद्र साळुंके, उज्ज्वला आवटे-अनिल शेळके, दीपाली सुर्यवंशी-मनोहर जाधव या आठ जोडप्यांचा विवाह झाला. याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून समाज बांधव उपस्थित होते.